Dhule : धुळे लोकसभा मतदारसंघात राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यात २० मेस मतदान होणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतच या मतदारसंघासाठी विद्यमान खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली. दोन टर्म झाल्याने व पक्षातील इच्छूकांची संख्या पाहता भाजप यावेळी उमेदवार बदलेल अशी चर्चा इच्छूक व उमेदवाराच्या विरोधकांनी उठवली होती. जोखीम नको म्हणून भाजपने श्री. भामरे यांना पुन्हा हॅटट्रीक साधण्यासाठी संधी दिली. (Dhule Lok Sabha Constituency)
तथापि त्यांच्या उमेदवारीनंतर ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे. या उलट महाविकास आघाडीत जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरु असल्याने शिवसेना (ठाकरे गट) वगळता उमेदवार जाहीर केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अद्यापही उमेदवारही जाहीर झालेले नाहीत. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पक्षातर्फे दोनच प्रमुख इच्छूक नावे आहेत, ही मोठी शोकांतिका असून एकूणच मतदारसंघात उत्साहाचा अभाव आहे.
मतदारसंघात प्रशासकीय पातळीवरील निवडणुकीची तयारी वगळता फारसा माहोल जाणवत नाही. त्यातच मालेगाव व धुळेसह खान्देशातील ऊन उमेदवार व कार्यकर्त्यांना घाम फोडणार आहे. या लोकसभा मतदारसंघाची मालेगाव मध्य, धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मुस्लीम बहुल वस्ती आहे. मुस्लीम बांधवांचे रोजे (उपवास) सुरु असल्याने लोकसभा निवडणुकीची म्हणावी तशी चर्चा नाही.
डॉ. भामरे यांना उमेदवारी जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही पक्षाचा अथवा कार्यकर्त्यांचा मेळावा झालेला नाही. डॉ. भामरे स्वत: व त्यांचे मोजके कार्यकर्ते विविध धार्मिक कार्यक्रम, सभा, समारंभ व विवाहात हजेरी लावत आहेत. हाच काय तो प्रचार सध्या सुरु आहे. डॉ. भामरे यांनी विकासकामे करतांना समतोल राखला नाही अशी टिका त्यांच्यावर करतांना विरोधक बागलाण व धुळे विधानसभा मतदारसंघाला विकास कामांमध्ये झुकते माप दिल्याचा आरोप करीत आहेत. (latest marathi news)
भाजपमधील गटबाजीही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सर्व गटांचे मनोमिलन करतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. शिवसेना कार्यकर्ते भामरे यांच्या उमेदवारीविषयी काहीशी अनास्था बाळगून आहेत. शिवसेनेतर्फे अविष्कार भुसे हे इच्छूक होते. त्यामुळे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते नाराज आहेत. आगामी आठवड्यात हे प्रश्न चर्चेतून मार्गी लागतील.
सर्व कार्यकर्ते जोमाने प्रचार करतील असा विश्वास डॉ. भामरे यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटलेला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला सतत तीन वेळा पराभव पत्करावा लागल्याने यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मतदारसंघ सोडावा अशी प्रारंभी चर्चा होती.
मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोणत्याही प्रबळ इच्छुकाने तयारी केलेली आढळून आलेली नाही. कॉंग्रेसतर्फे नाशिक जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे कॉंग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर या दोनच प्रमुख नावांची चर्चा आहे. मध्यंतरी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले पोलिस महानिरीक्षक अब्दुल रहेमान यांच्या नावाची चर्चा होती.
त्यांनी मतदारसंघाचा दोन ते तीन वेळा दौरा केला. येथील मतदारांचा कल व रागरंग पाहून नंतर ते बेपत्ता झाले. यामुळे डॉ. शेवाळे व सनेर यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याविषयी उत्सुकता आहे. या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त दौरा झाला आहे. या दौऱ्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह निर्माण झाला होता.
तथापि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना या दौऱ्यात विश्वासात घेतले नाही अशी टिका सहकारी पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत. सनेर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी वगळता मालेगाव विभागातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क साधलेला नाही.
एकूणच भाजपचा उमेदवार जाहीर झालेला असतांना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तसा जोश नाही. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये अवघे उमेदवार इच्छूक असतांना उमेदवारीचे घोडे अडले आहे. त्या पार्श्वभूमीवर रमजान ईदनंतरच या मतदारसंघात निवडणूक व प्रचाराचा माहोल जाणवेल.
शहरातील मध्यवर्ती व सर्वाधिक वर्दळीच्या मोसम पूल चौकात गेल्या आठवड्यात भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यासाठी व टिका करणारा फलक अनपेक्षितपणे झळकला होता. हा फलक विनापरवानगी लावण्यात आल्याने तो अवघ्या काही तासातच हटविण्यात आला.
तथापि या फलकाची जोरदार चर्चा झाली. त्यामुळे अद्यापही दबक्या आवाजात डॉ. भामरे यांचे विरोधक उमेदवार बदलाची चर्चा करत आहेत. प्रचाराला जोमाने सुरुवात झाल्यानंतरच डॉ. भामरे यांच्या उमेदवारीविषयीचे संशयाचे ढग विरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.