धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची जागा आणि उमेदवारीवरून सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण रंगीबेरंगी झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून जाहीर झालेला उमेदवार आहे तोच राहणार की बदलणार, या मतदारसंघातील जागा काँग्रेसला राहाणार की शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटणार, काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार, शिवसेनेला जागा सुटली तर उमेदवार कोण, अशा उलटसुलट चर्चांनी राजकीय धुळवडीत रंगत आणली जात आहे. (Dhule Lok Sabha Constituency)
लोकसभा निवडणूक जाहीर होणे आणि होळी, रंगपंचमी, धुळवडीचा सण साजरा होणे हे जणू समीकरण ठरते आहे. या वातावरणाचा लाभ उठवत अनेक कार्यकर्ते, काही पदाधिकारी, नेतेही निरनिराळ्या राजकीय अफवा पसरविण्यात अग्रेसर दिसतात. त्यातून त्या- त्या जाहीर किंवा संभाव्य उमेदवारावर दबावतंत्र तयार करणे, मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण तयार करणे.
त्या- त्या उमेदवारासाठी झटणाऱ्या कार्यकर्ते वा मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना रोखणे, असे विविधांगी पैलू रंगीबेरंगी चर्चा घडवून आणताना दिसतात. अशात रंगपंचमी, धुळवडीत ‘बुरा न मानो होली है' म्हणत जागेसह उमेदवारीवरून राजकीय धुळवडीत चांगलीच रंगत आणली जात आहे. रंगीबेरंगी चर्चांनी लोकसभेचा धुळे मतदारसंघ अक्षरशः ढवळून निघत आहे.
खासदार डॉ. भामरे अग्रेसर
सर्वप्रथम भाजपकडून जाहीर उमेदवार यादीत लोकसभेच्या धुळे मतदारसंघात खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे नाव समाविष्ट झाले. त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. त्यामुळे धुळ्यात पक्ष कार्यालयाजवळ आतीषबाजी, ढोलताशांच्या गजरात डॉ. भामरे यांच्या उमेदवारीचे समर्थकांनी स्वागत केले. यानंतर होळीसह राजकीय धुळवडीचा लाभ उठवत मतदारसंघातील भाजप पक्षांतर्गत विरोधकांनी डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध सुरू केला. (latest marathi news)
मालेगावला बॅनरबाजी, सोशल मीडियावर कहर करत भाजपचा उमेदवार आता बदलणार, अशी अफवा पसरविण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मतदारसंघात जो- तो भाजप उमेदवार बदलणार, अशा उलटसुलट चर्चांना ऊत आला. मग भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे.
कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, डॉ. माधुरी बोरसे आदींची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आली. असे असताना पक्षांतर्गत उफाळलेली गटबाजी रोखणे, डॉ. भामरे यांच्या उमेदवारीविषयी ठोस व ठाम भूमिका पक्षांतर्गत कुठल्या वरिष्ठ नेत्याने घेतली ते अद्याप मतदारांना समजून आलेले नाही. मात्र, डॉ. भामरे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे.
काँग्रेस- ‘उबाठा‘त स्पर्धा?
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसकडून अद्याप उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. यात डॉ. तुषार शेवाळे, श्यामकांत सनेर, डॉ. विलास बच्छाव, प्रताप दिघावकर, प्रशांत हिरे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आली. पाठोपाठ धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांचेही नाव उमेदवारी यादीत आघाडीवर आहे.
परंतु, त्यांनी उमेदवारीसाठी नकार देत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला पसंती दिल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. त्यामुळे आणखी कुणी ‘तगडा‘ उमेदवार गळाला लागतो का याची चाचपणी काँग्रेसकडून सुरू असल्याचे बोलले जाते. ही संधी साधत या मतदारसंघात २००९ पासून काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असल्याने जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटावी यासाठी स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत तळ ठोकला.
तीन दिवसांच्या मुक्कामानंतरही शिवसेनेला या जागेबाबत ठोस असे काही आश्वासन मिळालेले नाही. असे असताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे अविष्कार दादा भुसे हे उमेदवारीसाठी काँग्रेस प्रवेश करणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. या राजकीय धुळवडीने मतदारसंघातील वातावरण आणखी रंगीबेरंगी केले.
परंतु, यासंदर्भात श्री. भुसे यांनीही अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. या स्थितीसंदर्भात त्या- त्या पक्षस्तरावरून ठोस अशी भूमिका जाहीर केली जात नसल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडल्याचे दिसतात. होळी, रंगपंचमी, धुळवडीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील घडामोडींमध्ये विविध रंग भरले जात असल्याचे चित्र दिसते.
तरीही राजकीय धुळवडीचा घेतला आनंद...
धुळ्यातील भगवा चौकात पीजी फाउंडेशनतर्फे ॲड. पंकज गोरे यांनी सर्वपक्षीय रंगपंचमी, धुळवडीचा कार्यक्रम घेतला. त्यात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार श्यामकांत सनेर, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी जोसेफ मलबारी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रवींद्र आघाव आदी अनेक राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. त्यात डॉ. भामरे, श्री. सनेर यांनी एकमेकांना रंग लावत धुळवड साजरी केली. राजकीय धुळवडीत उलटसुलट चर्चांना ऊत येत असला व गटा- तटाचे राजकारण उफाळून येत असले तरीही धुळ्यात मात्र पीजी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी आनंद लुटला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.