Dhule Lok Sabha Constituency : कोट्यवधींची कामे, 50 नगरसेवक तरीही...! पराभूत डॉ. भामरेंना धुळ्यातून कमी पाठबळाचा प्रश्‍न

Dhule News : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती.
Dr. Subhash Bhamare
Dr. Subhash Bhamareesakal
Updated on

Dhule Lok Sabha Constituency : केंद्र-राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या योजनांचा लाभ, महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून होणारी कामे, ५० नगरसेवकांचे पाठबळ... जल्लोष, आंदोलने, विविध कार्यक्रमांसाठी ढीगभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोतावळा, त्या कार्यक्रमांचे फोटोसेशन, भाषणबाजी... असा सर्व पक्षपातळीवरचा लवाजमा असताना भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे शहरातूनच कमी मताधिक्य (लीड) कसे, असा प्रश्‍न जाणकारांपुढे उभा राहिला आहे. भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पक्षाचे तब्बल ५० माजी नगरसेवक यांनी खरेतर या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची गरज व्यक्त होते. (Dhule Lok Sabha Constituency Defeated issue dr Bhamre)

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. या उमेदवारीसाठी त्यांना पक्षपातळीवर काय कसरती कराव्या लागल्या असतील हे त्यांनाच माहीत. मात्र, आपल्या खासदारकीच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विशेषतः धुळे शहरासाठी काय केले याचेही मूल्यमापन होणे गरजेचे आहे. शेवटी कामांचे हेच संचित उमेदवारी मिळविण्यासाठी, निवडून येण्याचा दावा करण्यासाठी कामी येते.

कोट्यवधी रुपयांचा लाभ

धुळे शहरासाठी २०१९ मध्ये मंजूर अत्यंत महत्त्वाकांक्षी १६९ कोटी खर्चाची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना व धुळे शहराच्या देवपूर भागासाठी १५० कोटींची भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजना मार्गी लावणे, उर्वरित शहरासाठी दुसऱ्या टप्प्यातील ७१४ कोटींची मलनिस्सारण योजना, हद्दवाढ क्षेत्रासाठी प्रस्तावित १४२ कोटींची अमृत-२.० योजना, राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे शहरातील विविध रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी, गॅस पाइपलाइन योजना यासह इतर अनेक योजना व कामांचा यात समावेश आहे.

पाणीयोजनेचा गाजावाजा

धुळे शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा तर प्रचंड गाजावाजा झाला. अखेर ही योजनाही कार्यान्वित झाली. देवपुरातील भूमिगत गटार योजना अद्याप कार्यान्वित झाली नसली तरी ही योजनाही त्यांच्या खात्यातच जमा आहे.

याशिवाय इतर अनेक छोट्या-मोठ्या कामांचे श्रेय डॉ. भामरे यांना देऊन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवकांनी त्या-त्या वेळी त्यांचे कौतुक केले. त्याचा प्रचारात गाजावाजाही केला. कामांची ही शिदोरीही असताना धुळ्यातूनच डॉ. भामरे यांना सर्वांत कमी ‘लीड’ कसा या प्रश्‍नावर सध्या खल सुरू आहे. (latest marathi news)

Dr. Subhash Bhamare
Lok Sabha Election: देशातील नागरिकांनी फक्त सुशिक्षितांना दिलं निवडून? लोकसभा निवडणुकीत 121 निरक्षर उमेदवार पराभूत

नगरसेवकांचे योगदान काय?

डिसेंबर २०१८ च्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत धुळे शहरवासीयांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे भाजपचे तब्बल ५० नगरसेवक निवडून आले. नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यात पुन्हा एका नगरसेवकाची भर पडली. त्यामुळे धुळे शहराच्या बहुतांश भागात भाजप नगरसेवकांचे जाळे आहे.

महापालिकेतील विविध सभांमध्ये हे नगरसेवक डॉ. भामरेंचे कौतुक करताना थकायचे नाहीत. मात्र, प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीत या माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातून मतदाररूपी पाठबळ डॉ. भामरेंच्या पाठीशी किती उभे केले हा खरा प्रश्‍न आहे.

धुळे शहरात सर्वांत कमी मतदान झाले, त्यामुळे भाजपचे ५० माजी नगरसेवक मतदारांना बाहेर काढण्यात अपयशी ठरले असाही एक अर्थ निघतो. त्यामुळे भाजपच्या या ५० माजी नगरसेवकांचे योगदान काय, असा प्रश्‍न जाणकारांपुढे उभा राहतो.

निकृष्ट कामे, टक्केवारीचे ग्रहण

केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात कोट्यवधी रुपयांची कामे झाली, काही सुरू आहेत, काही प्रस्तावित आहेत. ही कामे महापालिकेतून जाताना मात्र त्यांना टक्केवारीचे ग्रहण लागल्याचे आरोप वेळोवेळी झाले आहेत.

त्यामुळे कामांचा दर्जा खालावणे, वेळेत कामे पूर्ण न होणे, परिणामी नागरिकांना भोगावा लागलेला त्रास, अधिकाऱ्यांवर नसलेला वचक, मर्जीतल्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे असेही प्रकार पाहायला मिळाले. या सर्व अनागोंदीचाही मतदारांवर आणि पर्यायाने मतदानावर परिणाम झाला का याचा शोध भाजपने घेण्याची गरज आहे.

Dr. Subhash Bhamare
Satara Lok Sabha : 'प्रत्येक निवडणूक ही खऱ्या अर्थाने कसोटीच असते'; विजयानंतर असं का म्हणाले उदयनराजे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.