Dhule Loksabha Election Code of Conduct : कुठल्याही कामाचे नवीन कार्यादेश देऊ नयेत, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे कार्यादेश निर्गमित केले आहेत व त्यांपैकी जे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे, तीच कामे पुढे सुरू ठेवता येतील. कार्यादेश दिला असला मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्यास ते काम सुरू करू नये. मतदान केंद्रांवरील व्यवस्था १९ मार्चपर्यंत पूर्ण करा, शासकीय कामाचे फलक/कोनशिला झाका, झेंडे/बॅनर काढा यासह इतर विविध सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Dhule Lok Sabha Election Code of Conduct marathi news)
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी आचारसंहितेचे पालन व एकूणच निवडणुकीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत शनिवारी (ता. १६) अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक घेतली.
उपायुक्त संगीता नांदूरकर व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत अधिकाऱ्यांकडे विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याअनुषंगाने आदेशही काढण्यात आले. महापालिका क्षेत्रात कोणत्याही नवीन कामांचे कार्यादेश देऊ नयेत तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जी कामे सुरू झाली आहेत, तीच पुढे सुरू राहतील. ज्या कामांना कार्यादेश दिला आहे मात्र प्रत्यक्षात ती सुरू झालेली नाहीत अशी कामे सुरू करू नयेत, असा आदेश अभियंत्यांना देण्यात आला.
मतदान केंद्र सुस्थितीत ठेवा
मतदान केंद्रावरील रॅम्प, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाइट व्यवस्था, शाळा डागडुजी, साफसफाईबाबत कार्यवाही करावी. मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मतदात्यांसाठी मंडपव्यवस्था १९ मार्चपर्यंत पूर्ण करून मतदान केंद्र सुस्थितीत ठेवावे, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
संस्थांकडून हमीपत्र घ्या
आपल्या नियंत्रणातील सरकारी/अनुदानित/खासगी शिक्षण संस्थांचा शालेय कामकाजासाठीच वापर केला जाईल याबाबत संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, कोणत्याही परिस्थितीत अन्य संस्थांमधील मनुष्यबळ कोणत्याही राजकीय उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरले जाणार नाही याबाबत सर्व संस्थाचालकांकडून लेखी हमीपत्र घ्या, अशा सूचना शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (latest marathi news)
फलक, कोनशिला झाका
मनपा हद्दीतील आमदार/खासदार सार्वजनिक निधीतील शासकीय कामाचे फलक, कोनशिला, कुंपण भिंतीच्या गेटवरील फलक तातडीने झाकावेत व तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडे सादर करावा. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्रशासकीय इमारतीतील कोनशिला, कमानी झाकाव्यात, झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स, रंगविलेल्या भिंती तसेच पेट्रोलपंप, गॅस एजन्सीवरील तसेच इलेक्ट्रिक पोलवरील जाहिराती काढणे/झाकण्याची कार्यवाही करावी.
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवरील उद्घाटन सोहळ्याच्या कोनशिला/कमानी झाकाव्यात, महापालिका वेबसाइट/सोशल मीडियावरील राजकीय व्यक्तींचे फोटो, जाहिरात ताबडतोब काढावी. प्रशासकीय इमारतीमधील सर्व दालनांतील, सभागृहातील राजकीय व्यक्तींचे फोटो, फलक काढावेत/झाकावेत.
सभामंडप परवानगी
महापालिका क्षेत्रातील सभामंडपांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, महापालिकेत आचारसंहिता कक्षाची स्थापना (दालन १०९) करण्यात आली असून, तेथे टोलफ्री क्रमांकाची व्यवस्था करावी.
दीर्घ रजांना ब्रेक
आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यास दीर्घ रजेवर सोडू नये, विभागप्रमुखांनीही दीर्घ रजेवर जाऊ नये, रजेवर जाणे आवश्यक असल्यास आयुक्त तथा प्रशासकांची परवानगी घ्यावी. कामात कोणत्याही प्रकारे दिरंगाई व हलगर्जी दिसून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.