Dhule Agriculture News : तृणधान्यात मका पेरणी सर्वाधिक! साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचा हमखास उत्पन्नामुळे कल

Dhule News : हमखास अन् काही झाले तरी हक्काचे दोन पैसे देणारे पीक म्हणून कांद्याकडे हमखास शेतकऱ्यांचा कल असतोच. यंदा पाऊस बऱ्यापैकी मेहरनजर असल्याने शेती व्यवसायाविषयी अपेक्षा वाढल्या आहेत.
Maize
Maizeesakal
Updated on

म्हसदी : अलीकडे कमी पाणी, अल्प खर्च आणि हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याकडे शेतकरी आकर्षिला जात आहे. यंदा तृणधान्यातील इतर पिकांपेक्षा साक्री तालुक्यात बळीराजाने मका पेरणीवर भर दिला आहे. यंदा साक्री तालुक्यात सुमारे ३२ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रात मका पिकाचा पेरा होईल असा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. हमखास अन् काही झाले तरी हक्काचे दोन पैसे देणारे पीक म्हणून कांद्याकडे हमखास शेतकऱ्यांचा कल असतोच. यंदा पाऊस बऱ्यापैकी मेहरनजर असल्याने शेती व्यवसायाविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. (Maize sowing highest in sowing Farmers in Sakri)

साक्री तालुक्यात सर्वत्र ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावत शेतशिवारात चौफेर अंतिम टप्प्यातील पेरणी, लवकर पेरणी झालेल्या पिकात कोळपणी, तणनाशक, कीटकनाशकाची फवारणी, निंदणी आणि ओल्या तुरीच्या शेंगा व गवार तोडणीची लगबग असे चित्र दिसत आहे. मृग नक्षत्राचे अंतिम चरण आणि आर्द्रा नक्षत्रात वरुणराजाने बहुतांश ठिकाणी दमदार हजेरी लावत सलामी दिली असली, तरी सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे.

या नक्षत्रात सर्वत्र केवळ भीजपावसाची फवारणी केली जात असल्याचे चित्र आहे. गेले वर्षभर दुष्काळाचे सर्वाधिक चटके बळीराजाने सोसले आहेत. विहिरींना पाणीच नसल्याने जी लागवड, पेरणी होईल झाली ती पावसाच्या पाण्यावरच. पावसाने सातत्य ठेवले, जोरदार पाऊस झाला तर पुन्हा विहिरी भरतील या भाबड्या अपेक्षेने खास कांदा पिकासाठी थोडेसे का होईना शेतकऱ्यांनी रिक्त क्षेत्र ठेवले आहे.

जोरदार पावसाची प्रतीक्षा

यंदा बऱ्यापैकी पावसामुळे खरीप हंगामातील क्षेत्र हिरवेगार दिसत असले तरी जलस्तरवाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे विहिरींची पाणीपातळी ‘जैसे थे’ आहे. ‘हिरवे रान’ केवळ भीजपावसाच्या कृपेमुळे दिसत असले तरी पिकांच्या जोरदार वाढीसाठी, विहिरींची पाणीपातळी वाढीसाठी, नदी, नाले, ओढे वाहण्यासाठी मुसळधार पाऊस व्हावा म्हणून ईश्वराकडे साकडे घातले जात आहे.

विहिरींना पाणीच नसल्याने पांढरे सोने अर्थात बागायती कपाशीचे क्षेत्र घटले आहे. राज्यातील ९४ दुष्काळी तालुक्यांच्या यादीत साक्री तालुक्याचे नाव अग्रभागी असते. गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या आठवणी मात्र कायम राहणार आहेत. एरवी कमी-अधिक प्रमाणात बागायती शेतीसह शेतीला जोडधंदा करणारे पशुपालक, दुग्धव्यावसायिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. (latest marathi news)

Maize
Jalgaon News : पक्के बिल घेऊनच कीटकनाशकांची खरेदी करा : कृषी विभागाचा सल्ला; कीटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्या

कांद्यानंतर मक्याकडे लक्ष केंद्रित

दर वर्षी पावसाळी, उन्हाळ कांदा अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत आणत असल्याचे वास्तव आहे. अलीकडे कांदालागवडीपासून काढणीपर्यंत मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. सध्या बऱ्यापैकी दर मिळत असला तरी दर टिकून राहावा, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

यापूर्वी अपेक्षित दर मिळत नसल्याने केलेला खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असतेच. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित तरी भाव दिला जावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांची असते. यंदा कांद्याने चक्क लोकसभेच्या राजकारणाची लक्तरे हलवून सोडली.

किंबहुना याचा तरी गांभीर्याने विचार राजकारण्यांना कांदा पिकाचा दर कायम स्थिर राहील अशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामावर पुढील समीकरणे अवलंबून असल्याने पावसाने हजेरी लावताच पेरणीची लगबग सुरू झाली आहे. साक्री तालुक्यात मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद चवळी, कापूस, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी झाली आहे.

कांदा बियाणे, रोपे महागणार

गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळामुळे विहिरींना पाणी नसल्याने कांदा रोपे मिळणे दुरापास्त होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे यंदा रोपासाठी लावलेली बियाण्याची उगवण क्षमता बिघडली आहे. शेतकरी शक्यतो शेतात डोंगळे (ढोले) लावून कांद्याचे बियाणे तयार करतात.

या वर्षी शेतकऱ्यांकडे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारातील कंपन्यांच्या कांदा बियाण्यातही यंदा मोठी वाढ झाली आहे. प्रतिकिलो हजार ते पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. बंहुताश शेतकऱ्यांनी घरचे बियाणे (उळे) तयार करून घेतले आहे.

"अलीकडे बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातही तृणधान्यात मका पिकाची पेरणी केली जात आहे. कमी वेळेत, अल्प खर्चात मका तयार होतो. दाण्यासह चाराही बऱ्यापैकी होत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मका पीक फायदेशीर ठरते."

- महेंद्र देवरे, शेतकरी, म्हसदीी

Maize
Jalgaon Crop Loan: खरीप पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवार! 965 कोटी रुपयांचे वाटप; राष्ट्रीयकृत बँकांचा आखडता हात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.