Dhule Market Committee Election : येथील रोमहर्षक, चुरशीच्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला ताकदीनिशी शह देण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भाजप-भदाणे गटाचा सपशेल धुव्वा उडाला.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलसह मतदारांनी भाजप-भदाणे गटाचे ‘रोडरोलर’ पंक्चर केले. येथील बाजार समिती आवारातील मतमोजणीनंतर रविवारी (ता. ३०) जाहीर निकालात १८ पैकी १६ जागा शेतकरी विकास पॅनलने राखल्या. (Dhule Market Committee Election result Congress led shetkari panel unilaterally won Roadroller lost news)
बाजार समितीच्या निवडणुकीतील सत्तासंघर्षात आमदार पाटील यांना शह देण्यासाठी भाजप आणि बोरकुंड येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी हातमिळवणी केली.
भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, मनोहर भदाणे, माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, बापू खलाणे,
तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, राम भदाणे यांच्यासह भदाणे गटाचे प्रमुख व उमेदवार बाळासाहेब रावण भदाणे विरुद्ध एकाकी खिंड लढविणारे आमदार कुणाल पाटील यांच्यात वर्चस्वासह प्रतिष्ठेची लढत झाली.
चाणक्य नीतीचा अवलंब
निवडणुकीतील १८ पैकी बिनविरोध भाजपचे महादेव परदेशी (व्यापारी मतदारसंघ) आणि भागवत चितळकर (हमाल व तोलारी मतदारसंघ) या दोन जागा भाजप-भदाणे गटाला मिळू शकल्या.
निकालानंतर बाजार समितीत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीची विजयी सभा झाली. तीत मतदारांनी धनशक्तीच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही, असा संदेश देत शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने कौल दिल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
‘रोडरोलर’ चिन्ह घेऊन काँग्रेसप्रणीत शेतकरी विकास पॅनलला भुईसपाट करण्याचे भाजप-भदाणे गटाचे मनसुबे होते; परंतु निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत चाणक्य नीतीचा अवलंब करीत भाजप-भदाणे गटप्रणीत परिवर्तन पॅनलचे रोडरोलर कधी पंक्चर झाले, ते त्यांच्या मातब्बर नेत्यांना कळलेच नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
विजयी उमेदवार असे
शेतकरी विकास पॅनलचे विजयी १६ उमेदवार असे (कंसात मते) ः गुलाबराव कोतेकर (८५०), हृषीकेश ठाकरे (८४६), यशवंत पाटील (८२७), नानासाहेब पाटील (८२२), बाजीराव पाटील (८०४), विशाल पाटील (८०२), गंगाधर माळी (७७३), विश्वास शिंदे (८८९),
छाया पाटील (८८१), नयना पाटील (८८४), कुणाल दिगंबर पाटील (८९० मते), धर्मा पाटील (६९४), योगेश पाटील (७२७), संभाजी देवरे-राजपूत (७२८), सुरेश भिल (७०३), विजय चिंचोले (बिनविरोध). तसेच विरोधी गटातील बाळासाहेब भदाणे, शालिनी पाटील, विजय गजानन पाटील, रावसाहेब गिरासे, अजय माळी हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले.
चाळीस वर्षांपासून अबाधित सत्ता
धुळे तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीवरील सत्ता महत्त्वाची ठरली आहे. काही स्थित्यंतरांनंतरही काँग्रेसचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आता आमदार कुणाल पाटील या पितापुत्राच्या नेतृत्वाखाली गेल्या ४० वर्षांपासून बाजार समितीवर काँग्रेसने अबाधित सत्ता राखली आहे.
१९८३ पासून पाटील पितापुत्राचे पॅनल विजयी होत आहे. रविवारी निकालानंतर शेतकरी विकास पॅनलचे सर्व १५ उमेदवार २२५ पेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.