Dhule Water Scarcity: जिल्ह्यात मध्यम, लघु प्रकल्पांनी गाठला तळ! जलसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन; टंचाईचे संकट गडद

Dhule News : या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा ४९.८७८ दलघमी म्हणजे केवळ १५.२१ टक्के आहे. वाडी-शेवाडी, अमरावती, मुकटी व सोनवद प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
Water Scarcity
Water Scarcityesakal
Updated on

Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. चार प्रकल्प कोरडे पडल्याने अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, अमरावती, सुलवाडे, मुकटी हे जिल्ह्यात मोठे जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा ४९.८७८ दलघमी म्हणजे केवळ १५.२१ टक्के आहे. वाडी-शेवाडी, अमरावती, मुकटी व सोनवद प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. अन्य प्रकल्पांतसुद्धा फारसा जलसाठा शिल्लक नाही. (Dhule Medium small scale projects in district dried up)

शहरासह परिसरात रविवारी (ता.९) सायंकाळी साडेसातला पावसाने जोरदार सलामी दिली. कानठळ्या बसणाऱ्या विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटात मुसळधार सुरू झाली. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. सर्वत्र काळोख, पावसाचा जोर, त्यामुळे सखल भागात पाणी साचले. दुपारपासून पावसाळी वातावरण होते.

सायंकाळी पावसाची सुरवात झाल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. जनजीवन काहीसे विस्कळित झाले. चार दिवसांपूर्वी पूर्वमोसमी पाऊस, दोन दिवसांपूर्वी मृगाच्या पावसाने सलामी दिल्यानंतर रविवारी तिसऱ्यांदा पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाने सातत्य राखले तर प्रकल्पातील जलसाठा वाढून टंचाईचे सावट निवळू शकेल.

चार प्रकल्पात ठणठणाट

गेल्या वर्षी याच महिन्यात पांझरा प्रकल्पात २७.८१ टक्के, मालनगावमध्ये २०.६५, जामखेडीत २७.२३, बुराईत १७.७६, करवंदला १९.७२, अनेरमध्ये ४१.२३, सोनवदला २.५१, अक्कलपाडात ५८.२८, वाडी-शेवाडीत २६.७२, अमरावतीला ३.५८, सुलवाडेत ५२.९१, मुकटी प्रकल्पात २४.६३ टक्के जलसाठा होता. एकही प्रकल्प कोरडा नव्हता.

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे आता प्रकल्पांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. परिणामी, पाणीसाठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. पाटबंधारे विभागाने ७ जूनला घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्पांपैकी चार मध्यम प्रकल्पांत ठणठणाट आहे, त्यात शून्य उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Scarcity
Delhi Water Crisis : कडाक्याच्या उन्हाळ्यात दिल्लीत पाणी प्रश्न तापला! आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

उपयुक्त साठाच शिल्लक

आठ मध्यम प्रकल्पांतसुद्धा केवळ १५.२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

मात्र, जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही, तोपर्यंत उपयुक्त पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पांझरा (ता. साक्री) प्रकल्पात ४.८९ दलघमी म्हणजे १३.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मालनगाव प्रकल्पामध्ये १.६९ दलघमी म्हणजेच १४.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जामखेडी मध्यम प्रकल्पाची स्थिती चांगली आहे. २४.४७ टक्के म्हणजेच ३.०२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

गावांची तहान भागेल

बुराई मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. ३.५२ टक्के म्हणजेच ०.५० दलघमी पाणीसाठा आहे. करवंद व अनेर (ता. शिरपूर) मध्यम प्रकल्पाची स्थिती त्यातल्या त्यात बरी आहे. करवंद धरणात २३.४३ टक्के आणि अनेर प्रकल्पात ३०.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्यावर शेतीसह अनेक गावे विसंबून आहेत. सध्या या प्रकल्पात ३.०२ म्हणजेच १.३२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याने पाणीसाठा गतीने कमी होत आहे. तापी नदीवरील सुलवाडे (ता. शिंदखेडा) बॅरेजमध्ये सध्या २९.६३ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील १९.२८ दलघमी उपयुक्त पाणीसाठ्यावर अनेक गावांची तहान भागत आहे. (latest marathi news)

Water Scarcity
Water Crisis : राज्यात ११ हजार गावे टँकरवर अवलंबून; राज्यातील धरणांत २१ टक्के जलसाठा

जिल्ह्यातील सद्यःस्थिती

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील शिल्लक जलसाठ्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाकडून ७ जूनला जाहीर झाली. त्यानुसार जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १५.२१ टक्के म्हणजे ४९.८७८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच चार मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे.

याशिवाय जिल्ह्यातील ४४ लघु प्रकल्पांमध्ये एकूण ४.२७३ दलघमी म्हणजेच ०.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत मध्यम प्रकल्पांत ३४.२४ टक्क आणि लघु प्रकल्पांमध्ये १४.१९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कनोली, सोनवद (ता.धुळे), वाडी-शेवाडी, अमरावती (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या मध्यम प्रकल्पांनी तळ गाठल्याने परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खोल गेल्याने त्या आटल्या आहेत.

‘एमआयडीसी’त पाणी कपात

अवधान (ता. धुळे) औद्योगिक वसाहतीमधील तलावाची पाणीसाठवण क्षमता एक हजार ८०० एमएलडी आहे. तलावात सद्य:स्थितीत केवळ १४० एमएलडी पाणीसाठा शिल्लक आहे. एमआयडीसीला या तलावाव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्त्रोत नसल्याने पाणी कपात लागू झाली आहे. तलावात पाणीसाठा वाढेपर्यंत कपात लागू असेल. अवधान औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे एकूण ६०० उद्योग आहेत.

त्यांना औद्योगिक वसाहत महामंडळातर्फे पाणीपुरवठा केला जातो. तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. एमआयडीसीला पूर्वी रोज ४.५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यात आता अर्धा एमएलडी कपात झाली आहे. रोज चार तास पाणी कपात लागू केली आहे. आता चार एमएलडी पाणीपुरवठा होतो. शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असतो, असे उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जलसाठा स्थिती

(टक्केवारी/गेल्या वर्षी व सध्या उपयुक्त)

* प्रकल्प.....२०२३.....२०२४

* पांझरा.....२७.८१.....१३.५०

* मालनगाव.....२०.६५.....१४.९२

* जामखेडी.....२७.२३.....२४.४७

* बुराई.....१७.७६.....३.५२

* करवंद.....१९.७२.....२३.४३

* अनेर.....४१.२३.....३०.४०

* अक्कलपाडा.....५८.२८.....३.०२

* सुलवाडे.....५२.९१.....२९.६

Water Scarcity
Jalgaon Water Crisis : जिल्ह्यातील धरणात 30 टक्के पाणीसाठा! गतवर्षीपेक्षा 10 टक्के पाणीसाठा कमी, पावसाची प्रतिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.