Dhule News : विदेशवारीवेळी पाठीत खंजीर खुपसल्याचे दुःख : आमदार जयकुमार रावल

Dhule : अमेरिकेत १७ वर्षांनंतर बहिणीला भेटीसाठी गेलो. त्या कालावधीत एक कार्यकर्ता (कामराज निकम) पाठीत खंजीर खुपसून गेल्याचे दुःख वाटते.
Jayakumar Rawal speaking at a loyal worker gathering at Rawal Gadhi.
Jayakumar Rawal speaking at a loyal worker gathering at Rawal Gadhi.esakal
Updated on

Dhule News : अमेरिकेत १७ वर्षांनंतर बहिणीला भेटीसाठी गेलो. त्या कालावधीत एक कार्यकर्ता (कामराज निकम) पाठीत खंजीर खुपसून गेल्याचे दुःख वाटते. जनतेऐवजी त्याने स्वतःचा विकास केला, अशा पद्धतीच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारींकडे मी दुर्लक्ष केले. त्याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांची माफी मागतो, अशी भूमिका माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी शुक्रवारी (ता. २६) मांडली. (MLA Jaykumar Rawal statement of Grief of being stabbed in back during foreign elections )

आमदार रावल यांचे विश्‍वासू सहकारी कामराज निकम यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघातील राजकीय वातावरण तप्त आहे. यासंदर्भात महिन्यापासून होणाऱ्या घडामोडींवर आमदार रावल यांनी भूमिका मांडली नव्हती. ती त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा रावल गढीवर मेळावा घेत स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी मेळाव्यात मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी-विक्री संघासह बाजार समिती, दूध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांत जास्त पदे दिली

आमदार रावल म्हणाले, की वयाच्या १६ व्या वर्षापासून समाजकारण सुरू केले आणि गावोगावी हिंडत एक-एक कार्यकर्ता जोडला आणि त्यांना घडवत बळ दिले. शिंदखेडा मतदारसंघातील दोन लाखांवर जनता माझी भाऊबंदकी आहे. या बळावर मतदारसंघात अनेक विकास योजना आणल्या. मी अमेरिकेत असताना जो कार्यकर्ता पाठीत खंजीर खुपसून गेला, त्याला मी सर्वांपेक्षा जास्त पदे दिली. त्याने त्या पदांद्वारे जनतेचा विकास न करता स्वविकास केला. त्याकडे माझे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी अनेक कार्यकर्त्यांनी केल्या. मात्र, ते गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची माफी मागतो. (latest marathi news)

Jayakumar Rawal speaking at a loyal worker gathering at Rawal Gadhi.
Dhule News : खंडित पुरवठ्याने वीजग्राहक मेटाकुटीला; साक्री तालुक्यात वीज समस्या जटिल

विकासावर दिला भर

आमदार रावल म्हणाले, की २० वर्षांपासून आमदार म्हणून कार्य करताना सारंगखेडा, सुलवाडे, प्रकाशा बॅरेज, अमरावती प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न केले. सुलवाडे- जामफळ- कनोली आणि प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सुलवाडे- जामफळ योजनेतून ५१ गावांच्या सिंचनासाठी शेतापर्यंत पाणी उपलब्ध केले. बुराई नदीच्या माथा ते पायथ्यापर्यंत बंधारे साकारून ती बारमाही केली. तसेच, ८५ गावांसाठी स्वतंत्र ग्रीड योजनेचे काम सुरू आहे. हायब्रीड अन्युईटी, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे रस्ते केले.

चोवीस तासांत बदल?

माझ्यासोबत राहून विकास कार्य पाहणारा तो कार्यकर्ता (श्री. निकम) २४ तासांत म्हणतो, की मतदारसंघात विकास झालाच नाही? त्या कार्यकर्त्याने घरी जात पाहावे की त्याच्या अंगणात चार ते पाच आलिशान वाहने असतात, त्याला तो काय समजणार? ज्या नेत्याने मोठे केले, त्याच्याविषयी एकेरी शब्दात बोलण्याचे संस्कार त्या कार्यकर्त्यात आले कसे? त्याची बीजे चार वर्षांपासून रोवली जात असल्याचे मला आता कळाले; परंतु कुणाची किती पात्रता आहे, हे मला चांगलेच ठाऊक आहे.

कुठलीच चिंता नको

इतिहासात गद्दार कधीच यशस्वी झाला नसल्याचे समोर येते. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कुठलीही चिंता करू नये. आपण आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे. ‘त्याचे’ नाव घेत मोठे करू नये. ‘त्या’ कार्यकर्त्यावर अतिविश्वास ठेवला, त्याबद्दल एकनिष्ठ कार्यकर्त्यांची माफी मागतो, असे आमदार रावल यांनी नमूद केले. पाच तास चाललेल्या मेळाव्यात काही पदाधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मनोगत व्यक्त करीत राजकीय घडामोडींवर तोंडसुख घेतले.

Jayakumar Rawal speaking at a loyal worker gathering at Rawal Gadhi.
Dhule News : फळ, भाजीपाला पिकांकडे वळलात तरच उत्पन्नात वृद्धी; पश्चिम पट्ट्यात कृषी विभागाचे चर्चासत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.