Dhule Monsoon Rain : यंदा मृग नक्षत्राच्या आरंभापासूनच वरुणराजाने दमदार हजेरी लावत सलामी दिली असली, तरी दुष्काळाने हतबल झालेल्या बळीराजाला दिलासा देणाऱ्या जोरदार पावसाच्या वादळाने शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना बेघर, निराधार केले आहे. गुरुवारी (ता. १३) सायंकाळी उशिरा झालेला जोरदार पाऊस आणि वेगवान वादळाने काकोर शिवारात गरीब शेतकरी वसंत मन्साराम देवरे यांचा पोल्ट्रीफार्म जमीनदोस्त झाला. ( monsoon rain Severe storms cause heavy losses to poultry traders )
शिवाय पोल्ट्रीतील ४९२ पक्षी (कोंबड्या)मृत्युमुखी पडले. देवीदास गजमल देवरे, सत्यभामा रामदास देवरे यांची शेड व कांदाचाळीचे सर्वाधिक नुकसान झाले. जोरदार वादळामुळे वीज वितरण कंपनीची रोहित्रे (डीपी)देखील वाकून गेली आहेत. म्हसदी शिवारातील नऊ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काकोर शिवारात तर यंदा दुबार नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
कारण यापूर्वी ७ जूनला दमदार पाऊस, वादळामुळे पोल्ट्रीतील कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. गुरुवारी (ता. १३) त्याच ठिकाणी पाळीव प्राण्यांची पत्र्याची शेड, तात्पुरत्या निवासी घरांचे पत्रे, कांदाचाळ, चाळीतील कांदा, फळे व इतर तत्सम झाडांवर निसर्गाने घाला घातला आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळपासून महसूल विभागातर्फे तलाठी अमोल बोरसे, पोलिसपाटील प्रमोद निकम यांनी पंचनामा केला.
शासकीय नियमानुसार पंचनामे केले जात असले तरी खरेच भरपाई मिळेल का, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनी काहूर माजवत आहे. कारण ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने नुकसानीची शृंखला सुरू झाली आहे. कधी दुष्काळी, तर नैसर्गिक संकटांना सामना करत करत आता बळीराजा मेटाकुटीला आला आहे. आज करावे तरी काय, हा प्रश्न आ वासून उभा आहे. (latest marathi news)
निसर्ग तारतो अन् मारतोदेखील...!
निसर्ग तारतोही आणि मारतोदेखील असे सहज म्हटले जाते. गेल्या वर्षी तीव्र दुष्काळाच्या झळांनी शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनताही होरपळून निघाली आहे. कारण दुष्काळी स्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यंदा वेधशाळा व हवामान विभागाच्या अंदाजानुसार चांगला पाऊस होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून होता. जोरदार पावसामुळे शेतीकामांना गतीही मिळाली आहे.
दुसरीकडे शेतकरी व शेती व्यवसायाशी निगडित लहान-मोठे व्यवसायही नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त होत आहेत. यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अर्थात ७ जूनला दमदार हजेरी लावत सलामी दिली. पाऊस दिलासा देणारा नक्कीच असला तरी नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे शेती व्यवसायाला दिलासा मिळणार असला तरी वादळामुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
वादळाचा थरार
गुरुवारी (ता. १३) सायंकाळचा जोरदार पाऊस आणि प्रचंड वादळाचा थरार काकोर शिवारात उपस्थित शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. साक्षात मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत, सुखरूप घरी परतल्याची माहिती युवा शेतकरी तथा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे संचालक हेमंत रामदास देवरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
जोरदार पाऊस आणि वेगवान वादळाच्या भीतीने काकोर शिवारातील सर्वच शेतकरी सैरभैर झाले. आडोसा मिळावा म्हणून दिसेल त्या ठिकाणी थांबले. जोरदार पावसामुळे घरातील पत्रे, पोल्ट्रीचे पत्रे उडाल्याचा थरार अनेकांनी पाहिला. दुसरीकडे सकाळी शेतात गेल्यावर झालेले नुकसान पाहून नुकसानग्रस्तांचे डोळे पाणावले.
नुकसानग्रस्त शेतकरी (कंसात नुकसान रक्कम रुपयांत)
- भास्कर रमेश देवरे : शेडचे पत्रे (आठ हजार)
- पूनम लक्ष्मण देवरे : पोल्ट्री (चार लाख ऐंशी हजार)
- देवीदास गजमल देवरे : शेड, कांदाचाळ (तीन लाख ९४ हजार)
- प्रशांत आनंदा देवरे : शेड, कांदाचाळ (६७ हजार)
- सत्यभामा रामदास देवरे : कांदाचाळ (चार लाख आठ हजार)
- चतुर उत्तम पाटील : शेतातील घराचे नुकसान (सोळा हजार)
- शरद रावण पाटील : शेतातील घराचे नुकसान (१९ हजार)
- अल्ताफ नासीर पटवे : शेड (नऊ हजार)
- नानाभाऊ मन्साराम देवरे : शेड (१९ हजार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.