Dhule Municipality News : मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकीपोटी कोट्यवधी रुपये थकीत आहे. थकबाकीदारांना यात दिलासा मिळावा, यासाठी शास्ती माफी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेऊन थकबाकी अदा करावी, ३ मार्चच्या लोकअदालतीतही भाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी केले. (Municipal Commissioner statement defaulters should take advantage of scheme and pay dues)
थकबाकीदारांना ही शेवटची संधी असून, यापुढे शास्ती माफी दिली जाणार नाही. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ अशी ही संधी आहे. दरम्यान, कारवाई मोहीम अधिक तीव्र व कठोर केली जाईल, असा इशाराही श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला.
हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण धुळे शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवायादेखील सुरू आहेत.
दरम्यान, मार्चअखेर जास्तीत जास्त करवसुली व्हावी, थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी पुढे येऊन कटू कारवाई टाळावी, यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी गुरुवारी (ता. २२) महापालिकेत पत्रकार परिषदेतून थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन केले.
कोट्यवधींची थकबाकी
धुळे महापालिका क्षेत्रातील हद्दवाढ भागातील मालमत्ताधारकांकडे तब्बल ६९ कोटी रुपये मालमत्ता कर थकबाकी आहे. यातील आत्तापर्यंत केवळ सात कोटी ७५ लाख रुपये वसुली झाली. तर उर्वरित शहरातील मालमत्ताधारकांकडे एकूण ५८ कोटी रुपये कर घेणे आहे.
त्यातून आत्तापर्यंत २२ कोटी २२ लाख रुपये वसुली झाली आहे. अर्थात हद्दवाढ क्षेत्रातून अद्यापही ६१ कोटी, तर उर्वरित शहरातून अद्यापही ३६ कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे एकूण ९७ कोटी रुपये अद्यापही कर वसूल होणे बाकी आहे.
शास्ती माफी योजना
थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करून उर्वरित कर भरण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही शास्ती माफी योजना आहे. त्यानंतरही थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा प्रशासन अधिक कठोर कारवाईच्या पवित्र्यात आहे. शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा. ही शेवटची संधी असून, यापुढे शास्ती माफ केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला.
लोकअदालतीत भाग घ्या
३ मार्चला धुळ्यात होणाऱ्या लोकअदालतीच्या माध्यमातूनही थकबाकीदारांना थकबाकीच्या प्रकरणांचा निपटारा करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हजार नोटिसा वाटप झाल्या असून, एकूण दहा हजार नोटिसा देण्याचे नियोजन असल्याचे श्रीमती दगडे-पाटील यांनी सांगितले.
कठोर कारवाई
येत्या काही दिवसांत थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने कारवाई अधिक तीव्र व कठोर केली जाईल. अनधिकृत नळजोडणीधारकांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल. दोन वर्षांच्या पाणीपट्टी एवढा दंड व चालू वर्षाची पाणीपट्टी अशी एकूण तीन वर्षांची पाणीपट्टी अनधिकृत नळधारकांकडून वसूल केली जाणार असल्याचेही श्रीमती दगडे-पाटील यांनी सांगितले.
- सर्वेक्षणातून नवीन ८५ हजार मालमत्तांची भर
- हद्दवाढ क्षेत्रात ६१ कोटी बाकी
- उर्वरित शहरात ३६ कोटी थकीत
- पाणीपट्टीपोटी ३०-३५ कोटी रुपये बाकी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.