धुळे : औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी २०१२ मध्ये विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतजमीन संपादित झाली. मात्र भूसंपादनाचा मोबदला देताना दुजाभाव झाला, असा आरोप करत सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सुदैवाने हा प्रयत्न उधळून लावण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावून लवकरच न्याय मिळेल, गैरप्रकार झाला असेल तर चौकशी करू, असे आश्वासन दिले.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
भूसंपादन मोबदल्याच्या प्रश्नावरून सोमवारी विखरण येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांपैकी जयसिंह सरदारसिंग गिरासे यांच्याकडे पेट्रोलची बाटली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ती बाटली जप्त केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावून लवकरच न्याय मिळेल व गैरप्रकार घडला असेल तर चौकशी करू, असे आश्वासन दिले.
विखरण येथील शेतकरी जयसिंह गिरासे यांच्यासह प्रवीण पाटील, दगेसिंह गिरासे, विजयसिंह गिरासे, रवींद्र दाभाडे, पांडुरंग पाटील, रजेसिंह गिरासे, देवीदास साळुंखे, ज्ञानेश्वर गिरासे आदींचा आंदोलनात सहभाग होता.
शेतकऱ्यांचा आरोप, मागणी
आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विखरण येथील पद्मसिंग रामसिंग गिरासे यांच्या गट क्रमांक २९०/३ मधील शेतात फळबाग होती का याची चौकशी करावी. त्यांनी पैशांच्या जोरावर दलालामार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच अधिकाऱ्यांना आमिष दाखवून खोटा पंचनामा करून घेतला.
त्यांना एक कोटी ८९ लाख रुपये मोबदला देण्यात आला. तसेच अंबालाल रामसिंग गिरासे यांनीही अशाच पद्धतीने खोटा पंचनामा केला. त्यांना मोबदला मिळणे बाकी आहे. मात्र, या प्रकरणाचीही चौकशी करावी, गुन्हा दाखल करावा. अन्य शेतकऱ्यांनीही कागदोपत्री फळबागायत दाखवून व अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे पंचनामे करून घेतले आहेत.
त्यांच्या शेतात एकही फळझाड नाही, विहीर नाही, पाइपलाइन नाही, वीजजोडणी नाही, मोटार नाही. दुसरीकडे मात्र जयसिंह सरदारसिंह गिरासे यांच्या शेतात फळबाग असतानाही त्यांना आजपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्वरित मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.