लामकानीतील आग प्रकरणी मंदिर विश्वस्त मंडळाला लाखाचा दंड 

lamkani
lamkani
Updated on

लामकानी : आबालवृद्धांच्या श्रमदानातून बहरलेली आणि पोटच्या गोळ्यासारखी सांभाळलेली येथील गोवर्धन डोंगरावरील (जि. धुळे) वनसंपदा आगीत खाक झाली. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात संतापाची लाट उसळली. त्यामुळे जनभावना लक्षात घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाईच्या निर्णयासाठी येथे विशेष ग्रामसभा झाली. तीत संबंधितांना एक लाख 11 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

येथील बाजारपेठेत विशेष ग्रामसभा झाली. डॉ. धनंजय नेवाडकर, सरपंच धनंजय कुवर, माजी सरपंच नानाभाऊ पाटील, डॉ. वाय. टी. चौधरी, सुरेश वाणी, माजी मुख्याध्यापक बी. सी. महाले, दीपक शिरोडे, छोटू पाटील, भटू पाटील, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरहर महाले, माजी उपसरपंच मनोहर तलवारे, भाजपचे गुलाब धनगर, बाजीराव महाले, पंकज मराठे, सुनील तलवारे, अशोक पानपाटील, जगन सोनार, आरभुजा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश महाले व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दंडात्मक कारवाईचा नियम 
पर्यावरणाचा -हास आणि घटनेबाबत संताप व्यक्त झाल्याने ग्रामसभेत जाब विचारून जबाबदार मंदिर विश्‍वस्तांना नुकसान भरपाईपोटी एक लाख अकरा हजारांचा दंड ठोठावण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. गोवर्धन डोंगरावरील संवर्धित 360 हेक्‍टर परिसरात चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदीचा नियम लागू आहे. कुणी हा नियम मोडला तर त्यांना पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून आणि नियमांचे पालन, नियंत्रणासाठी गावासह संयुक्त वनव्यवस्थापन समिती संबंधितांवर दंडात्मक कारवाई करते. येथील गोवर्धन डोंगरावर 21 मार्चला घडलेली आगीची घटना नुकसानकारक आणि श्रमदानावर पाणी फिरविणारी ठरली. त्याबाबत गावासह सर्वत्र संताप व्यक्त झाल्याने शुक्रवारी विशेष ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय झाला होता. 

दुर्लक्षामुळे घडली घटना 
संवर्धित गोवर्धन डोंगरावर आरभुजा देवी मंदिर परिसरात साफसफाईसाठी विश्‍वस्त मंडळाकडून नानाभाऊ ढिवरे व साहेबराव पाटील यांची नेमणूक झाली. त्यांनी कुठलाही सारासार विचार न करता, निष्काळजीपणातून संकलित कचऱ्याचा ढीग जाळण्यास सुरवात केली. हवेमुळे आग पसरली आणि तिने डोंगरावरील वनसंपदा भस्मसात केली. त्यात हजारो टन चाऱ्यासह विविध पक्षी, कीटक, ससे, सर्प जळून खाक झाले. जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले. सकाळी दहाला लागलेली आग रात्री बारापर्यंत चालली. तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून, चटके सहन करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, वाऱ्याचा जोर आणि घनदाट गवतामुळे आगीने रौद्र रूप धारण करत वनसंपदा बेचिराख केली. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नेवाडकर आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून बोडका डोंगर पाणलोट क्षेत्र विकासातून हिरवागार झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह, चाऱ्या प्रश्‍न निकाली निघालेला असताना आणि कोरडवाहू गाव बागायती होऊन विकासाकडे झेपावत असताना ही घटना घडली. अशी घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीची गरज ग्रामसभेत व्यक्त झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.