Dhule News : चालू आर्थिक वर्षात अर्थात २०२४-२५ चा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिकेकडून दर वर्षीप्रमाणे एप्रिलमध्ये १० टक्के सूट देण्यात येत आहे. याचा लाभ घेत कर भरण्यासाठी महापालिकेत गर्दी होत आहे. या योजनेंतर्गत एकाच दिवसात महापालिकेच्या तिजोरीत ३० लाख रुपये कर जमा झाला. (Dhule Municipality News)
मालमत्ता करापोटी मार्च-२०२४ अखेर ४५-४६ कोटी रुपये वसूल झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येते. यानंतरही सुमारे ८० कोटी रुपये थकबाकी आहे. दुसरीकडे पाणीपट्टीपोटी किती मागणी होती, त्यातून किती वसूल झाली याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. अधिकारी त्यावर काही बोलायला तयार नाहीत.
दरम्यान, आता चालू आर्थिक वर्षाची करवसुलीही सोमवार (ता. १५)पासून सुरू झाली. दर वर्षीप्रमाणे एप्रिलमध्ये चालू वर्षाचा कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १० टक्के, मेमध्ये ८ टक्के, तर जूनमध्ये ६ टक्के सूट देण्यात येते. सद्यःस्थितीत १० टक्के सूट योजना सुरू आहे. या योजनेचा फायदा घेत कर अदा करणाऱ्या नागरिकांची महापालिकेत गर्दी पाहायला मिळत आहे.
सोमवारी (ता. १५) योजनेचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३० लाख रुपये जमा झाले. मालमत्ताधारकांचा हा प्रतिसाद पाहता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही हुरूप आला आहे. कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत.
त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात यासासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी व्यवस्थेची पाहणी केली. सहाय्यक आयुक्त समीर शेख, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, शिरीष जाधव, वसुली निरीक्षक पंकज शर्मा, मनोज चौधरी, मुकेश अग्रवाल, संजय भडागे आदी उपस्थित होते. (latest marathi news)
व्यवस्था पुरवा
मालमत्ता कर भरणासाठी बँक काउंटर वाढविणे, बँकेचे कर्मचारी वाढविणे, महापालिकेच्या वसुली कर्मचाऱ्यांचे पथक नेमणे, नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी बैठकव्यवस्था तसेच बँकेची वेळ वाढविणे.
ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी स्वाइप मशिन व आनुषंगिक व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एप्रिल, मे व जूनमधील सवलत योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाइन कर भरा
दरम्यान, महापालिकेत कर भरण्यासाठी रांगा लावण्याशिवाय मालमत्ताधारक घरूनच ऑनलाइन पद्धतीनेही कर भरू शकतात. मालमत्ता कर भरण्यासाठी https://propertytax.dhulecorporation.in/ViewBill.aspx व पाणीपट्टी भरण्यासाठी https://dhulemcwaterbill.org/waterbill/OnlineTaxAndNewC या संकेतस्थचा उपयोग करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.