Dhule News : रक्ताच्या नात्यांचाही भार झाला. पोटच्या मुलांना सोडून आईबाप परांगदा झाले. त्यामुळे अनाथ झालेल्या तिघांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना १२ वर्षांचा मुलगा भेटला. त्याने भिक्षा मागून आईच्या ममतेने तिघांचा सांभाळ केला. त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाची नजर पडली. पथकप्रमुख उपनिरीक्षक छाया पाटील यांनी सर्व कहाणी जाणून घेतली. (Sub Inspector Chhaya Patil Help Three orphan children)
तिन्ही अनाथ भावंडांची बालगृहात रवानगी करण्यात आली. त्यांच्या भविष्याची जबाबदारीही छाया पाटील यांनी स्वीकारली. २० जुलैला दामिनी पथकप्रमुख उपनिरीक्षक छाया पाटील सहकाऱ्यांसह सकाळी शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालत होत्या.
पित्रेश्वर स्टॉपजवळ उभ्या चार बालकांवर त्यांचे लक्ष गेले. जवळपास कोणीही नाही, भांबावलेल्या अवस्थेत मुले उभी पाहून त्यांनी वाहन थांबविले. त्यांची विचारपूस केल्यावर एक हृदयद्रावक कहाणी उघड झाली आणि दामिनी पथकाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.
आईबापाने केला त्याग
शीतल (वय तीन वर्षे), सलमान (पाच) व अक्षय (सहा) ही तीन सख्खी भावंडे आहेत. त्यांचे आई-वडील काही दिवसांपूर्वी शहरात राहत होते. वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यांची आणि पत्नीची दररोज कडाक्याची भांडणे होत होती. त्याला कंटाळून आई घर सोडून निघून गेली. पाठोपाठ व्यसनी वडीलदेखील कुठेतरी निघून गेले. ही तिन्ही भावंडे उघड्यावर पडली. रोजच्या खाण्याची, झोपण्याची भ्रांत सुरू झाली. (latest marathi news)
साई पावला
एके दिवशी त्यांना साई भेटला. शहरातील आकाश गार्डन हॉटेलजवळ राहणाऱ्या साई साळवेचे मातृछत्रही हरपले आहे. त्याला तिघांची दया आली. मात्र त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्याच्याजवळ काहीच साधन नव्हते. त्यामुळे तो शहरात भिक्षा मागून अन्न गोळा करून तिघांना खायला घालत असे. रात्री पालिकेचे उद्यान, बसस्थानक, उघडी शेड अशा जागी झोपेसाठी निवारा घेत त्यांचा जीवनक्रम सुरू होता.
पथकाची मदत
मन सुन्न करणारी तिघांची कहाणी ऐकून दामिनी पथकातील सर्वच हेलावले. निरीक्षक के. के. पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार, उपनिरीक्षक छाया पाटील, हवालदार रोशनी पाटील, नूतन सोनवणे, मोहन सूर्यवंशी, चालक प्रभाकर भिल यांनी तिन्ही भावंडांना सोबत घेतले. त्यांना घरी नेऊन स्वच्छ अंघोळ घालून नवे कपडे दिले.
कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून शीतलला धुळे येथील शिशुगृह, तर सलमान आणि अक्षयला बालगृहात दाखल करण्यात आले. आईबाप सोडून गेल्यावर पहिल्यांदाच खाकीतल्या मायेची ऊब लाभलेल्या तिघांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. त्यांचा सांभाळ करणाऱ्या साई साळवेचेही पोलिसांनी आभार मानले. याकामी सांगवी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांचेही सहकार्य लाभले.
"आईबापाच्या मायेला दुरावलेल्या लेकरांना मदत करू शकलो याचे समाधान आहे. शिशुगृह आणि बालगृहात दाखल केलेल्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठीचा खर्च आम्ही उचलणार आहोत. शहरात आणखी काही निराधार, अनाथ मुले आढळल्यास नागरिकांनी दामिनी पथकाशी संपर्क साधावा." - छाया पाटील, उपनिरीक्षक, दामिनी पथकप्रमुख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.