Dhule News : शहरासह जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने थेट ४४.५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याचे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक ठरला. शिवाय साधारण मागील दोन महिन्यांपासून शहरात चाळिशीपार व गेल्या काही दिवसांत ४२, ४३, ४४ अंशांवरच तापमान फिरत आहे. त्यामुळे धुळेकर पुरते हैराण झाले आहेत.
अशा या तापलेल्या धुळ्यात एअर कंडिशनर (एसी)चा गारवा कुणाला नकोसा असेल. पण कुणाचा खिसा किती भरलेला त्यावर हा एसीचा गारवा अवलंबून आहे. असो. धुळे महापालिकेचा खिसा (तिजोरी) एव्हाना रिकामाच असतो. ‘एसी’ लावण्यात मात्र धुळे मनपा श्रीमंत म्हणावी लागेल. कारण नव्या, जुन्या महापालिकेत मिळून तब्बल ५० ‘एसी’ असल्याची माहिती समोर आली आहे. (Dhule summer temperature 50 AC in old municipality)
धुळे शहर व जिल्हा सध्या प्रचंड उन्हाने होरपळून निघत आहे. अगदी रात्रीही तापमान प्रचंड असल्याने घामाच्या धारांनी नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. अशा या तापलेल्या वातावरणात गारवा मिळावा यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने पंखे, कूलर, एसीची व्यवस्था करत आहे. ज्यांची आर्थिक स्थिती जेमतेम ते पंख्याच्या गरम हवेवरच दिवसरात्र काढतात.
ज्यांच्याकडे थोडा पैसा आहे ते कूलरची तजवीज करतात, ज्यांच्याकडे ‘एसी’ घेण्याची क्षमता आहे, ते एसीच्या गारव्यात आहेत. घराघरांतली ही वेगवेगळी कहाणी आहे. दुसरीकडे शासकीय, खासगी कार्यालयांमध्येही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती पाहायला मिळते. बड्या अधिकाऱ्यांच्या दालनात ‘एसी’ तर इतर काही ठिकाणी कूलरची व्यवस्था आहे.
धुळे मनपातील स्थिती
धुळे महापालिकेची नवीन इमारत सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. विजेशिवाय भरपूर प्रकाश राहावा, हवा खेळती राहावी यादृष्टीने इमारतीची रचना आहे. मात्र, याच नव्या सुसज्ज इमारतीत एसींची संख्या भरमसाट दिसते. अर्थात अधिकाऱ्यांबरोबरच बहुतांश पदाधिकाऱ्यांची दालने असल्याने तेथे एसी हवाच. त्यामुळे महापालिकेच्या नव्या इमारतीत तब्बल ४५, तर जुन्या इमारतीत पाच असे एकूण तब्बल ५० एसी असल्याची माहिती समोर आली आहे. (latest marathi news)
सोशल मीडियावर व्हायरल
महापालिकेच्या जुन्या-नव्या इमारतीमधील विविध दालनांसह आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी किती एसी आहेत याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही माहिती खरी असल्याचा दुजोरा मनपा अधिकाऱ्यांकडून मिळाला. अर्थात काही ठिकाणी एसी आवश्यक आहेत. दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या दालनात एसी, कूलरची व्यवस्था नाही अशीदेखील स्थिती आहे.
असे विभाग, असे एसी
मनपा नवीन इमारत : संगणक विभाग (दोन), पॅनल रूम (एक), विद्युत विभाग (एक), उपायुक्त कार्यालय (एक), बांधकाम विभाग (एक), विरोधी पक्षनेता कार्यालय (एक), उपमहापौर कार्यालय (एक), महापौर कार्यालय (तीन), स्थायी समिती सभापती कार्यालय (दोन), महिला व बालकल्याण सभापती कार्यालय (एक), सभागृहनेता कार्यालय (एक), उपायुक्त कार्यालय (एक), उपायुक्त कार्यालय (एक), आयुक्त कार्यालय (सहा), अतिरिक्त आयुक्त कार्यालय (दोन), स्व. दिलीप पायगुडे सभागृह (दोन), भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह (दहा), लेखा विभाग (दोन), मुख्य लेखाधिकारी कार्यालय (एक), नगररचना विभाग (एक), आस्थापना विभाग (दोन), लेखापरीक्षक कार्यालय (एक), वसुली अधीक्षक कार्यालय (एक).
मनपा जुनी इमारत : सर्व्हर रूम (दोन), आयुक्त कार्यालय (एक), अतिक्रमण विभाग (एक), कुटुंबकल्याण विभाग, ओटी रूम (एक). आयुक्त निवासस्थान (तीन).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.