Dhule News : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि जिल्हा वाचक शाखा (डीएसबी) ही पोलिस प्रशासनाचे डोळे आणि कान समजली जाते. परंतु, अलिकडच्या काही घडामोडींमुळे `एलसीबी`च्या कारभाराची लक्तरे वेशीपलीकडे टांगली गेली आहेत. त्यामुळे या विभागाची प्रतिमा स्वच्छ आणि शुध्दीकरण करण्याची गरज भासू लागली आहे. यात लाचखोरीच्या घटनेनंतर `डिटेक्शन` आणि `कलेक्शन`, अशी रूढ केली जाणारी व्याख्या बदलण्याचे आव्हान शासनासह `आयजीं`च्या सहकार्याने जिल्हा पोलिस प्रशासनाला पेलावे लागेल. (dhule There is need to change image of lcb department marathi news)
गुन्हेगारांना शोधणे आणि प्रलंबीत गुन्ह्यांचा छडा लावणे ही ‘एलसीबी’ची कार्यप्रणाली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासात ‘एलसीबी’ आघाडीवर असते. जिल्हा कार्यक्षेत्र असल्याने पोलिस ठाण्यांसोबत महत्त्वाच्या गुन्ह्यात ‘एलसीबी’ समांतर तपास करते. ‘नेक्स टू एसपी’ अशा विशेष ओळखीमुळे ‘एलसीबी’ला पोलिस दलात मानाचे स्थान असते.
या शाखेचे कर्मचारी, अधिकारी हुशार आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तल्लख असतात, असे मानले जाते. या शाखेत प्रतिवर्षी नियुक्तीसाठी अनेकांचे विनंती अर्ज येत असतात, तर `एलसीबी`तून बदली होऊ नये म्हणून कार्यरत अनेकांकडून प्रयत्न सुरू असतात. या शाखेतील बाह्य हस्तक्षेपाचा मुद्दा सध्या चिंतेचा विषय ठरतो आहे.
‘डीएसबी’चे कार्य
पोलिस दलाच्या जडणघडणीत जिल्हा विशेष शाखेला महत्त्व आहे. सण, निवडणुका, ‘व्हीआयपी’च्या भेटीची रचना- व्यवस्था आखणे, विविध संघटना, चळवळी, राजकीय पक्षांच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती अगोदर गोळा करणे व हालचालींवर लक्ष ठेवणे, नंतर माहितीचे विश्लेषण करणे, राज्य गुप्तचर विभागाला, पोलिस ठाण्यांना ‘इन- पुट’ देण्याचे प्रमुख कार्य ही शाखा करत असते. पोलिस ठाण्यांमधील गोपनीय शाखेची मदत अशा कार्यात होत असते.
‘एलसीबी’ चर्चेत
असे असताना गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे जिल्ह्यात ‘एलसीबी’ चर्चेत आहे. काही वर्षांत या शाखेने गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत नावलौकिक मिळविला आहे. त्याचवेळी तत्कालिन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड व ‘एलसीबी’च्या पोलिस निरीक्षकामध्ये झालेला वाद, दोन आठवड्यांपूर्वी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक, दोन कर्मचारी लाचखोरीत अडकल्याच्या प्रकरणामुळे ‘एलसीबी’ची पर्यायाने पोलिस दलाची प्रतिमा काळवंडली गेली आहे. ती स्वच्छ करण्याचे आव्हान पोलिस प्रशासनापुढे आहे.
निरीक्षकांची गोची
काही महिन्यांपूर्वी श्रीकांत धिवरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकाचा पदभार घेतला. पदभारापूर्वी काही प्रकरणांमुळे पोलिस दलाची काळवंडलेली प्रतिमा स्वच्छ करण्याची मोहीम श्री. धिवरे यांनी हाती घेतली. त्यात धडक कारवाईतून त्यांनी पोलिस दलात शिस्त आणि जिल्ह्यात ढेपाळलेली कायदा- सुव्यवस्था रूळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
एकिकडे ही स्थिती असताना तत्कालिन पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात झालेल्या वादग्रस्त बदल्या, त्यांची तडकाफडकी बदली आणि त्यामुळे विविध पदांवर मौलिक प्रयत्नांती नियुक्त पोलिस निरीक्षकांची श्री. धिवरे यांच्या कायदा- सुव्यवस्थेसंबंधी कठोर पावित्र्यामुळे गोची झाली. अशात ‘एलसीबी’बाबत लाचखोरीचे प्रकरण घडले.
रिक्त पदाचे काय?
सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न, पूर्व इतिहासामुळे ज्वालामुखीच्या तोंडी असलेल्या संवेदशनशील धुळे जिल्ह्यात दोंडाईचासह धुळे शहरात सुशी नाला परिसरात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे `डीएसबी` शाखेची भूमिका वरिष्ठांना तपासावी लागणार आहे.
त्यात पोलिस ठाण्यांमधील गोपनीय शाखा आणखी बळकट करावी लागणार आहे. तसेच, अशा संवेदनशील कालावधीत `एलसीबी`ला तत्काळ नव्याने पोलिस निरीक्षकाच्या नियुक्तीची गरज असताना बरेच दिवस झाले तरी हे पद नेमके कुणासाठी आणि कुठल्या कारणामुळे रिक्त आहे याचा विविध पातळीवरून शोध घेतला जात आहे.
जिल्ह्याची परिपूर्ण माहिती असावी...
‘एलसीबी’च्या पोलिस निरीक्षकाची नियुक्ती होताना त्यांची प्रतिमा चांगली असावी. त्यास जिल्ह्यातील परिपूर्ण, बारीक- सारीक माहिती असावी. तो स्थानिक माहितगार असल्यास जिल्हा पोलिस प्रशासनाला मदत होऊ शकते.
नेमक्या याच बाबीकडे दुर्लक्ष करीत बाह्य हस्तक्षेपातून किंवा मर्जीतील पोलिस निरीक्षकाला ‘एलसीबी’त नियुक्ती देण्यासाठी मौलिक चढाओढ लागलेली असते. याचा अनुभव जिल्हा काही वर्षांपासून घेत आहे. त्याची परिणीती लाचखोरीत अडकलेल्या `एलसीबी`च्या पोलिस निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांवरील कारवाईतून दिसून आली आहे. त्यातून काय बोध घेतला जातो हे पाहणे गरजेचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.