Kisan Samvad Yatra : सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे विविध मागण्यांसाठी निघालेला बिऱ्हाड महामोर्चा १७ दिवसांत ४३२ किलोमीटर पायपीट करीत मंत्रालयावर धडकणार आहे. तो नंदुरबार, साक्रीमार्गे धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा मार्गस्थ होत असून, २३ डिसेंबरला मुंबईत पोचेल.
राज्य सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडविल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा हजारो मोर्चेकऱ्यांसह सभेचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी दिला.(farmer Foot march at mantralaya for various demands kisan samvad yatra dhule news)
पायी बिऱ्हाड महामोर्चा मालेगाव येथे १३ डिसेंबर, १७ डिसेंबरला नाशिक येथील आदिवासी विकास भवनाजवळ पोचेल. त्या ठिकाणी जाहीर सभा होईल. राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि डाव्यांसह आंबेडकरवादी पक्षांचे नेते मार्गदर्शन करतील, अशी माहिती श्री. ढमाले यांनी दिली.
धुळ्यात महामोर्चा दाखल
सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नंदुरबारहून ७ डिसेंबरला निघालेला पायी बिऱ्हाड महामोर्चा रविवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास कुसुंबा (ता. धुळे) आणि तेथून सुरत बायपासमार्गे सोमवारी (ता. ११) दुपारी शहरात धडकला.
गुरुद्वारा, मालेगाव रोड, आग्रा रोड, गांधी पुतळा, नवीन महापालिकामार्गे जेल रोडवरील क्युमाइन क्लबजवळ मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. नंतर सभेत रूपांतर झाले.
शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चा मार्गक्रमण करीत आहे. मोर्चेकऱ्यांच्या ध्वजांनी लक्ष वेधून घेतले आहे. शहरात रात्रभर ठिकठिकाणी मुक्काम ठोकल्यानंतर महामोर्चा मंगळवारी (ता. १२) मालेगावकडे कूच करेल.
घोषणांनी शहर दणाणले
मोर्चेकऱ्यांच्या घोषणेमुळे शहर दणाणले. आंदोलक नेते सुभाष काकुस्ते, श्री. ढमाले, रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, मन्साराम पवार, रणजित गावित, आर. टी. गावित, यशवंत माळचे, अॅड. विशाल साळवे, आनंद लोंढे, दिलीप गावित, विक्रम गावित, सत्तार शाह, अॅड. मदन परदेशी, वसंत पाटील आदींसह महामोर्चात हजारो महिला-पुरुष सहभागी झाले आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सचिन हिरे, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
मोर्चेकरांच्या मागण्या
नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, बागलाण (सटाणा), मालेगाव, शिरपूर तालुके पूर्णतः दुष्काळी जाहीर करावेत. नुकसान झालेल्या वनहक्क दावेदार आदिवासींसह सर्व शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. सरसकट कर्जमुक्त करावे. पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी. साक्री तालुक्यातील २०१८ मधील दुष्काळाची शेतकरी व वनहक्क दावेदारांना नुकसानभरपाई लवकर देण्यात यावी.
आदिवासी व इतर जंगलनिवासी वनहक्क कायदा २००६ ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचा सातबारा द्यावा. आदिवासीविरोधी वन कायदा २०२३ रद्द करावा. आजपर्यंतच्या वहिवाटदार गायरान जमीनधारकांना हक्काचा सातबारा देण्यासाठी नवा कायदा करावा. कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यातशुल्क तत्काळ मागे घ्यावे.
मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. बनावट आदिवासी हटवावेत आणि आदिवासी यादीतली घुसखोरी थांबवावी. केंद्र सरकारने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करावा. लखीमपूर-खिरी येथे पाच शेतकऱ्यांना चिरडून ठार करणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर कारवाई करावी.
शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना जाहीर नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना अनुदान देऊन अन्नसुरक्षा कायद्याची (रेशन) अंमलबजावणी करावी. ऊसतोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करावी. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी. २८ नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन जाहीर करावा.
''आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जातात. मागण्यांप्रश्नी समाधान होत नाही, तोपर्यंत पायी बिऱ्हाड महामोर्चा मंत्रालयापर्यंत जात राहील. महामोर्चात प्रत्येक तालुका व जिल्ह्यातून आदिवासी, शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.''-किशोर ढमाले, राज्य संघटक, सत्यशोधक शेतकरी सभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.