Dhule Unseasonal Rain : अवकाळीने शेतकऱ्यांची दाणादाण; वीज पडून 20 ट्रॅक्टर मक्याचा चारा खाक

Appa Chindha Goykar's fodder of maize (kadba) burnt due to lightning in Padgan Shivara.
Appa Chindha Goykar's fodder of maize (kadba) burnt due to lightning in Padgan Shivara.esakal
Updated on

Dhule Unseasonal Rain : रविवारी (ता. २६) दुपारी विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून, दिघावे (ता. साक्री) येथे वीज पडून दुभत्या जनावरांसाठी विकत घेतलेला सुमारे २० ट्रॅक्टर मक्याचा (कडबा) चारा जळून खाक झाला आहे.

पै-पै जमवत दुभत्या जनावरांसाठी विकत घेतलेला चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.दुपारी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात दिघावे परिसरात पाऊस झाला. दिघावे येथील पाडगण शिवारात आप्पा चिंधा गोयकर यांनी शेणपूर, मलांजन, उंभरे, उंभरटी, प्रतापपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून विकत घेत चारा आणला होता.(Farmers grain spoil due to unseasonal rain in district dhule news )

दुपारी पावसाबरोबर कोरड्या चाऱ्यावर वीज पडल्याने आग लागली. भरपावसात आगीने रौद्र रूप धारण केले. श्री. गोयकरांसह लगतच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तोपर्यंत चारा जळून भस्मसात झाला होता.

चाराटंचाईच्या काळात दुहेरी संकट

यंदा अल्प पावसामुळे साक्री तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अल्प पावसामुळे खरीप पिके केवळ तग धरून उभी होती. खरीप हंगाम जेमतेम हाती आल्याने चाराही फारसा हाती येऊ शकला नाही. उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकंती नको म्हणून पशुपालक इकडून तिकडून कोरडा चारा आणून संग्रही करून ठेवत आहेत.

दिघावे येथील आप्पा चिंधा गोयकर यांनीदेखील दुभत्या जनावरांसाठी चारा संग्रही ठेवला होता. चाराटंचाईमुळे चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. पण जनावरांसाठी चारा शोधणेही अवघड होत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.

...आग विझविण्यासाठी धावाधाव!

रिपरिप पावसाबरोबरच मक्याच्या (कडबा) चाऱ्यावर वीज पडल्याने आग लागली. भरपावसात लागलेली आग पाहून लगतच्या शेतकऱ्यांनी ती विझविण्यासाठी धावाधाव केली. आप्पा चिंधा गोयकर यांच्यासह काळू गोयकर, सुकलाल गोयकर, धुडकू टकले, काशीराम गोयकर, उपसरपंच नामदेव टकले, सोनू टकले, भिका गोयकर आदींनी धाव घेत मिळेल त्या साधनातून पाणी आणत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

विशेष म्हणजे पावसाची रिपरिप सुरू असतानाही आग आटोक्यात येऊ शकली नाही. ‘साहेब, यंदा कमी पावसामुळे अपेक्षित उत्पन्न तर मिळालेच नाही. दुसरीकडे चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहेच. पै-पै जमवत दुभत्या जनावरांसाठी चारा संग्रही ठेवला होता. आता मी मुक्या जनावरांना चारा कसा उपलब्ध करू,’ अशी आर्त भावना दूध उत्पादक शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

''ऐन चाराटंचाईच्या काळात वीज पडून चारा जळाल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. आमदार मंजुळा गावित, तलाठी दिलीप चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली आहे. शासनाने नैसर्गिक नुकसानाचीभरपाई द्यावी.''-नामदेव टकले, उपसरपंच, दिघावे

पश्चिम पट्ट्यात बिगरमोसमी पावसाची जोरदार हजेरी

वार्सा ः पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात दुपारी साडेबारापासून पूर्णपणे ढगाळ वातावरण झाले. तुरळक पावसाने सुरवात होऊन थंड वातावरण होऊन गारठा निर्माण झाला आहे. नंतर वादळी वाऱ्यासह धुके निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या बिगरमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान व ज्या शेतकऱ्यांनी मसूर, वाटाणा, हरभरा व गव्हाची पेरणी केली असेल तर तेही या बिगरमोसमी पाण्याने धोक्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांची नागली, बाजरी, सोयाबीन खळ्यात उडवे करून ठेवलेले पीक व गुरांचा चारा या अवकाळी पावसाने खराब होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर एवढा होता की अर्ध्या तासातच पश्चिम पट्टा जलमय करून टाकला. बिगरमोसमी पावसामुळे भाजीपाला शेतीचेही नुकसान झाले.

चावडीपाडा (ता. साक्री) ः परिसरात रविवारी सुरू असलेला पाऊस. कापणी झालेल्या पिकाचे पावसामुळे झालेले नुकसान.
चावडीपाडा (ता. साक्री) ः परिसरात रविवारी सुरू असलेला पाऊस. कापणी झालेल्या पिकाचे पावसामुळे झालेले नुकसान.esakal
Appa Chindha Goykar's fodder of maize (kadba) burnt due to lightning in Padgan Shivara.
Jalgaon Unseasonal Rain : आज जोरदार पावसाचा अंदाज; जिल्ह्यात ढगाळ वातावरण

भडणे येथे अवकाळी पावसामुळे चारा पिकाचे नुकसान

शिंदखेडा ः तालुक्यातील भडणे परिसरात रविवारी (ता. २६) दुपारी दीडला अवकाळी पाऊस झाला. पावसात शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे ४० मिनिटे पाऊस सुरू राहिला.

पावसामुळे शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग साठवणूक केलेला चारा खराब झाल्यामुळे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मक्याचा चारा महागड्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणला होता. अगोदरच या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असताना चारा व उत्पन्न जेमतेम आले आहे.

काही शेतकऱ्यांनी चारा प्लॅस्टिक कागद टाकून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र काही शेतकऱ्यांचा चारा शेतातच उभा राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे दादर, हरभरा या पिकांचा काही प्रमाणात फायदा, तर काही प्रमाणात नुकसानही झाले.

भडणे ः साठवणूक केलेल्या चाऱ्याचे झालेले नुकसान. दुसऱ्या छायाचित्रात दादर पिकाचे झालेले नुकसान.
भडणे ः साठवणूक केलेल्या चाऱ्याचे झालेले नुकसान. दुसऱ्या छायाचित्रात दादर पिकाचे झालेले नुकसान.esakal
Appa Chindha Goykar's fodder of maize (kadba) burnt due to lightning in Padgan Shivara.
Nashik Unseasonal Rain : आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं अन..

जेबापूरला शाळेचे पत्रे उडाले

पिंपळनेर ः येथे रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यादरम्यान दुपारच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार असला तरी शेतात असलेल्या काढलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जेबापूर (ता. साक्री) येथे वादळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे उडालेले पत्रे उडाले.

शरासह परिसरात विविध ठिकाणी दुपारी एक ते दीडच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

काढणीला आलेल्या भात पिकाचे व नुकत्याच लावण्यात आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचीदेखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते.

जेबापूर (ता. साक्री) ः वादळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे उडालेले पत्रे.
जेबापूर (ता. साक्री) ः वादळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे उडालेले पत्रे. esakal
Appa Chindha Goykar's fodder of maize (kadba) burnt due to lightning in Padgan Shivara.
Pune rain News : आंबेगावच्या पुर्व भागात आज गारांसह झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.