Dhule Drought News : जिल्ह्यात पंचवीस दिवसांपासून पाऊस नाही. जेमतेम महिनाभराची पिके झाली अन् पावसाने ओढ दिली आहे. आता दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिके ऊन धरू लागली आहेत.
कोरडवाहू जमिनीतील पिकांची नाजूक अवस्था झाली आहे. पावसाळ्याला महिना उरला आहे. उत्तरार्धात पावसाचा पिकांना काडीचा फायदा होणार नाही. कपाशीचे पीक जेमतेम अर्धा फूट वाढले आहे.
‘कवय पाऊस यी. कोणता खुगले कपाशी मोठी व्हयी नि आयी कपाशी येचसूत,’ अशी चिंता शेतकरी व शेतमजूर व्यक्त करू लागले आहेत. भयाण दुष्काळाचे संकेत मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. (Farmers panic as there are signs of drought in dhule news)
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही. जून महिना कोरडा गेला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत पेरण्या झाल्या. आता जवळपास महिनाभरापासून पाऊस नाही. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, सोयाबीन आदी सारीच पिके ऊन धरू लागली आहेत.
हलक्या जमिनीत पिके पाण्याअभावी अन् उन्हामुळे करपू लागली आहेत. भयाण दुष्काळाची चाहूल लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वर्षी देवाने ताटात दुष्काळ वाढून ठेवल्याची जाणीव होत असल्याने चिंता वाढली आहे.
देवाला साकडे घालून पाऊस पडे ना
पाऊस पडावा म्हणून ग्रामीण भागात विविध पारंपरिक पद्धतीने उजाळा दिला जात आहे. देवाचा धावा केला जातोय.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पण वरुणराजाची कृपादृष्टी नसल्याने शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. बियाणे, पेरणी, खते, निंदणी, खेडणी आदींमध्ये हजारो रुपये टाकले गेले आहेत. दिवाळीला कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी आहेत.
विहिरीही आटू लागल्या
नदी-नाले वाहिलेले नाहीत. लहान-मोठे सारेच बंधारे कोरडे झाले आहेत. तलाव व धरणांत मृत साठा आहे. विहिरी व कूपनलिकांची पातळी खोलवर गेली आहे. विहिरींचा उपसा होत आहे. बागायती पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.
"सलग तीन वर्षे पावसाने आबादानी केली होती. चौथ्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे." -आनंद भुजबळ, शेतकरी, कापडणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.