Dhule Drought News : खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तिन्ही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यारवर येऊन ठेपले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत नजर पैसेवारी घोषित होत असते, ती अद्याप झालेली नाही. भयावह दुष्काळाची चाहूल लागलेली असूनही शासन ई-पीक नोंदणीचा आग्रह धरत आहे.
शेतशिवारात करपलेली पिके आणि चारा दिसत आहे. पाणीटंचाईसह चाराटंचाई निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांनी आतापासूनच पशुधन विक्रीस काढले आहे.
याचा परिणाम दूधटंचाईवर होणार आहे, तर ‘जायेल देव पोयाले येस’ असे वयोवृद्ध अनुभवातून सांगताहेत. यामुळे तर शेतकरी शेतमजुरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Fodder shortage for dairy cattle in dhule drought news)
खानदेशात बरोबर एक महिन्यापासून पाऊस नाही. जून कोरडा गेला. जुलैतील दोन-चार दिवसांच्या पावसाने पेरण्या पूर्ण झाल्या. जुलैत दोन-चार वेळा अधिक श्रावणाच्या पूर्वार्धात पावसाचे शिरवे कोसळत होते. त्यामुळे थोडे समाधान होते. त्यानंतर पावसाने पाठ दाखविली आहे. शेतकरी शेतशिवारात जात आहेत. पण चित्त लागत नाही. एवढी पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिके करपत आहेत. बांधावरील आणि कुरणांमधील चारा वाळला आहे. आगामी काळात गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्या यांना वैराण म्हणून हिरवा चारा कोठून आणावा, हा प्रश्न निर्माण होणार आहे. मागील वर्षातील साठविलेला चारा संपलाय. दुभत्या जनावरांसाठी बागायतदार शेतकऱ्यांकडून चाऱ्यासाठी अवलंबून राहावे लागणार आहे.
चाऱ्याअभावी पशुधन विक्रीचा कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना पोळ्याच्या अगोदरच बैलांची विक्री करण्यासाठी धजावे लागणार आहे. यामुळे मोठा मानसिक धक्का सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भेगाळलेली माती आणि करपत चाललेली पिके अन् शेतकरी बापाची घालमेल पाहून युवा कवी भूषण खलाणे म्हणताहेत-
‘भेगाळलेल्या मातीला हा कुठला शाप
पावसा वाट पाहून थकलाय बाप
सुकतोय शिवार अन् चिमण्यांचा घास
बापाच्या गळ्याला दुष्काळाचा फास
पावसा, गिधाडांच्याआधी त्याला तुझीच आस’
दुधाचे दर कडाडणार?
गेल्या सलग तीन वर्षांपासून मुबलक पाऊस झाला. जमिनीची पातळी वाढली. जिल्ह्यात दुभते पशुधन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हजारो लिटर दूध गुजरातमध्ये निर्यात होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून चाऱ्यासह दूधटंचाई निर्माण झाली आहे. दुधाचे दरही कडाडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.