शिरपूर (जि.धुळे) : येथील राहुल राजू भोई या तरुणाच्या खून प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान संशयिताला पोलिसांकडून सहकार्य केले जात असल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी येथील तालुका भोई समाज संघटनेतर्फे करण्यात आली. (Hand over investigation of Rahul Bhoi murder case to CBI statement of Bhoi community Dhule News)
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील आमदार अमरिशभाई पटेल यांची भेट घेऊन त्यांना नुकतेच निवेदन दिले. खून प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचा खबरी असून, त्याचा फायदा मिळून त्याला पोलिसांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
संशयिताने खून केल्यानंतर स्वत:च्या अंगावर जखमा करून घेतल्या असून, कायद्यातून पळवाट काढण्याचा हा प्रकार आहे. घटनेनंतर लगेचच शिरपूरमध्ये उपचार न घेता फरारी होऊन तो धुळे शहरापर्यंत कसा पोचला हेदेखील संशयास्पद आहे.
यापूर्वी संशयिताने पोलिसांचे नाव वापरून भोई समाजातील लोकांना धाक दाखविणे, मासे घेऊन त्याचे पैसे न देणे, लहानसहान कारणावरून हत्याराची भीती दाखविणे, गँग तयार करून दहशत माजविणे असे गुन्हे केले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
संशयिताला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी या हेतूने गुन्ह्याचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आदिवासी विकासमंत्री आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
सात संशयितांना अटक
खून प्रकरणात सात संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन युवकाचाही समावेश आहे. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झाल्यानंतर लगेचच प्रमुख संशयिताचा माग काढून त्याला तातडीने अटक करण्यात आली. पाठोपाठ शास्त्रीय तपास करीत एकापाठोपाठ सहा संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
प्रमुख संशयित गणेश तथा भट्या जगताप याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. एका अल्पवयीन संशयिताला बालसुधारगृहात रवाना केले आहे. उर्वरित पाच संशयितांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यं पोलिस कोठडी दिली होती.
गुरुवारी (ता. ९) त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली. गुन्ह्यासंदर्भात काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन निरीक्षक आगरकर यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.