Nandurbar News : लग्नाच्या सर्व रूढी-परंपरांना फाटा देत नंदुरबारमध्ये सत्यशोधक पद्धतीने एक अनोखा लग्नसोहळा पार पडला.
विशेष म्हणजे वर- वधू दोघेही उच्च शिक्षित आहेत. डॉ. चंद्रकांत व डॉ. सायली या जोडप्याने सत्यशोधक विवाहाचा मार्ग निवडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘लग्न’ ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रूढी आणि त्यातून होणारे शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याचे दिसते. (Highly Educated Doctor Couple Gets Married By Satyashodhak Method Marriage arranged through Mahatma Phule Foundation Nandurbar News)
कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा, कुठल्याही पद्धतीचा बडेजाव न करता महात्मा जोतिराव फुले यांना आदर्श मानत, सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय वधू-वर या दोन्ही पक्षांनी घेतला आणि त्याला वधू-वरांनी होकारही दिला.
नंदुरबारात महात्मा फुले फाउंडेशन या पुरोगामी विचारांच्या संघटनेचे कार्य जोरात सुरू आहे. त्याच फाउंडेशनचे सदस्य शिक्षक भटू महाले व शिक्षक संजय देवरे यांच्या याच फाउंडेशनच्या कार्याच्या माध्यमातून विचार जुळले, त्या विचारांचे रूपांतर दोघांच्या सोयरीकीमध्ये झाले.
भटू महाले यांचा चिरंजीव चंद्रकांत व संजय व ज्योती देवरे यांची कन्या सायली हे दोन्ही डॉक्टर आहेत. आई-वडील शिक्षक, नातेवाईक उच्च शिक्षित, सर्व सुखसोयींचे जीवन असताना या दोन्ही कुटुंबांची सोयरीक जमली ती केवळ विवाह म्हणून या सोयरीकीमध्ये कोणतेही देणे-घेणे नाही.
स्वखुशीने लग्नसोहळा वधूपिता संजय देवरे यांनी आपण करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लग्न मात्र सत्यशोधक पद्धतीनेच करण्याचा दोन्ही कुटुंबीयांनी निर्णय घेतला. त्याला वधू-वरांनी स्वखुशीने समती दर्शविली. कुटुंबात अनोख्या पद्धतीने हा सत्यशोधक विवाह सोहळा नातेवाईक, आप्तेष्टांच्या साक्षीने झाला.
मंगलाष्टक, तांदळाच्या अक्षतांना फाटा
जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक सत्य धर्मीय विवाह महात्मा फुले फाउंडेशनचे कार्यकर्ते भटू महाले व संजय देवरे यांनी विवाहाच्या जुन्या रूढी-परंपरेला छेद देत सत्यशोधक पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. विवाह सोहळ्याची सुरवात खंडेरावाची तळी भरून व महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली.
तद्नंतर वधू-वरास शपथ देऊन नंतर लग्न लावण्यात आले. या वेळी पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुलेंनी रचलेली मंगलाष्टके म्हटली गेली. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला. विवाह सोहळ्यात लगेचच मॅरेज सर्टिफिकेट सत्यशोधक समाज संघातर्फे नवदांपत्याला देण्यात आले.
या सोहळ्याचा विधी सत्यशोधक भगवान रोकडे यांना केला. हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी समाजबांधवांनी गर्दी केली होती. महात्मा फुले फाउंडेशनने यापूर्वी वधू-वर परिचय मेळावा घेतला असून, त्यातूनच पहिला सत्यशोधक विवाह लावून महाले व देवरे परिवाराने समाजात आदर्श निर्माण केला आहे. सर्वत्र या परिवारासह उच्च शिक्षित डॉक्टर दांपत्याचे कौतुक होत आहे.
असा झाला लग्नसोहळा
खंडेरायाची तळी भरून, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या वेळी लग्न मंडपात नवरा आणि नवरीचे आगमन होताच फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्नविधीच्या कार्याला सुरवात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.