Dhule Dengue News : शहराच्या विविध भागांत डेंगीचा उद्रेक झाला असून, मोठ्या संख्येने रुग्ण शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याशिवाय प्रकृती गंभीर झाल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी व परगावच्या रुग्णालयांत रवाना झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.(Increasing Dengue patient at Shirpur dhule news )
विशेषत: विद्यार्थी वर्गात डेंगीची लागण होण्याचे प्रमाण अधिक असून, पालकवर्गही हादरला आहे. पालिकेने डेंगी निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर हाती घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
परतीच्या पावसानंतर दर वर्षी होणारा डेंगीचा फैलाव या वर्षीही कायम राहिला आहे. तीन आठवड्यांपूर्वी डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. प्रारंभी व्हायरल फीव्हर म्हणून उपचार दिल्यानंतरही रुग्णाच्या प्रकृतीला उतार पडत नसल्यामुळे डेंगीची तपासणी करण्यास सुरवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ डेंगीचे रुग्ण निष्पन्न झाले.
त्यांची संख्या आजअखेर वाढती असून, रुग्णांनी दवाखाने, रुग्णालये भरली आहेत. पॅथॉलॉजी लॅब्समध्येही डेंगीच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात चिंता पसरली आहे.
तपासणीचे त्रांगडे
शहराचा कोणताच भाग डेंगीमुक्त राहिलेला नाही. तापाची लक्षणे जाणवू लागताच रुग्ण दवाखान्यात धाव घेतो. मात्र डेंगीचे निदान करण्यासंदर्भात खासगी आणि शासकीय पद्धतीत मोठा फरक आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या निदानासाठी रॅपिड चाचणी केली जाते. तीन चाचण्यांनंतर तेथे रुग्णाला डेंगी आहे किंवा नाही ते कळते.
याउलट शासकीय रुग्णालयातून रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन धुळे येथील शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. तेथून सात ते आठ दिवसांत चाचणी अहवाल प्राप्त होतो. त्याशिवाय रुग्णाला डेंगी आहे याची पुष्टी शासकीय यंत्रणा करीत नाही. दरम्यानच्या काळात रुग्णाला अचूक उपचार मिळाल्यास तो बराही होतो.
आर्थिक भुर्दंड
खासगी रुग्णालयात डेंगीची चाचणी, दाखल करून केले जाणारे उपचार आणि औषधे यांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रुग्णाची प्रकृती खालावल्यास त्याला महानगरातील रुग्णालयात नेणे भाग पडते. अशा वेळी खर्चात कितीतरी पटीने वाढ होते. त्यामुळे डेंगी शारीरिक क्षमता खच्ची करण्यासह आर्थिकदृष्ट्याही रुग्णाला वा त्याच्या कुटुंबाला नेस्तनाबूद करणारा ठरला आहे.
पालिका अॅक्शन मोडवर
शहरातील डेंगीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालिकेने तातडीच्या उपाययोजनेला सुरवात केली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी भामरे व प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांच्या अखत्यारीत शहराचे चार भाग करून तेथे दररोज फवारणी आणि धुरळणी केली जाणार आहे.
पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या मदतीसाठी पालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेंगीचे रुग्ण आढळलेल्या घरांसह शेजारील घरांतही तपासणी केली जाणार आहे.
''डेंगी निर्मूलनासाठी पालिका तातडीचे उपाय योजत आहे. नागरिकांनी घरातील रेफ्रिजरेटरचे ट्रे, कूलर्स यातील पाणी काढून टाकावे. पाणी साठलेले टायर्स नष्ट करावेत. झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठत नाही याकडे लक्ष द्यावे. तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात असतात याची नोंद घेऊन आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. सार्वजनिक आणि वैयक्तिक दक्षतेद्वारेच डेंगी निर्मूलन करता येणे शक्य आहे.''-प्रमोद भामरे, प्रशासक, शिरपूर पालिका
''उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी तीन ते चार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार होत असून, आठवडाभरात बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. शासकीयदृष्ट्या डेंगीचे निदान करण्यासाठी स्वतंत्र पद्धत आहे. त्यामुळे आम्ही अशा रुग्णांना डेंगीसदृश संबोधून आवश्यक ते उपचार देत आहोत. रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा आहे.''-डॉ. अमोल जैन, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.