कळवण-सुरगाणा मतदारसंघात यंदाची निवडणूक विकास या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असून चौरंगी लढत असली तरी मुख्य लढत दुरंगीच होणार असून माकपचे जीवा गावित यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. गावित आठव्यांदा विधानसभा सर करणार कि नितीन पवारांना मतदार पसंती देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
माजी मंत्री ए.टी.पवारांचे चाळीस वर्ष वर्चस्व
२००९ पूर्वी कळवण व सुरगाणा हे स्वतंत्र मतदारसंघ होते. कळवण मतदारसंघावर माजी मंत्री ए.टी.पवारांचे तब्बल चाळीस वर्ष वर्चस्व होते. १९८५ चा अपवाद वगळता ए.टी.पवारांनी तब्बल आठ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. शेजारच्या सुरगाणा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवा गावित यांनीही सात वेळा प्रतिनिधित्व केलेले होते. मात्र दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत कळवण तालुका विकासात अग्रेसर तर सुरगाणा तालुका विकासप्रक्रियेत मागे पडल्याचे चित्र आहे.
अनेक प्रश्नांनी डोके वर काढले
गेल्या पाच वर्षात मतदारसंघात अनेक प्रश्नांनी डोके वर काढले आहे.कळवण तालुक्यातील ओतूर धरणाची गळती रोखण्यात आलेले अपयश, तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण, टक्केवारीची कीड लागल्याने तालुक्यातील रस्त्यांचा घसरलेला दर्जा.कळवणच्या मेनरोडचे तीन वेळा भूमिपूजन होऊनही रस्त्याचा कामाला न सापडलेला मुहूर्त, पुनंद धरणातून सटाणा शहराला जाणाऱ्या पाईपलाईन संबंधीची मवाळ भूमिका,सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यात भेडसावणारी भीषण पाणीटंचाई,रोजगाराअभावी होणारे स्थलांतर यासारख्या अनेक कारणांमुळे मतदारांत नाराजीचा सूर उमटत आहे.प्रभावी ठरू शकतील अशी कामे मतदारसंघात झाली नसल्याचे मतदारांकडून उघड बोलले जात असल्याने त्याचा फटका येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध माकप सामना रंगणार
यंदा माकप कडून विद्यमान आमदार जीवा गावितांची उमेदवारी निश्चित झाली आहे.राष्ट्रवादीकडून माजी मंत्री ए.टी.पवारांचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने उमेदवारी दिली आहे.भाजपकडुन डझनभर इच्छुक असतांना शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवत सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डेंना उमेदवारी दिली आहे.मात्र आजपावेतो शिवसेनेला लक्षणीय यश या मतदारसंघात मिळालेले नाही.मनसेने ऐनवेळी भाजपमधून प्रवेश केलेल्या राजेंद्र ठाकरे यांना उमेदवारी दिली असली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यापासून दोन हात लांब असल्याचे चित्र आहे.त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध माकप असाच सामना रंगणार आहे. एकंदरीतच पक्षापेक्षा व्यक्तीभोवती कळवण-सुरगण्याची निवडणूक फिरत असल्याने गावित विरुद्ध पवार हीच मुख्य लढत होणार असून विकास हाच केंद्रबिंदू मानून मतदान होणार असल्याने जीवा गावित पुन्हा विधानसभेची पायरी चढतात कि नितीन पवार पदार्पणाच्या निवडणुकीतच विजय मिळवतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
माकपला खिंडार
सध्या हा मतदारसंघ माकपच्या ताब्यात आहे.मात्र ऐन निवडणुक तोंडावर असतांना माकपचे कळवण तालुका सेक्रेटरी हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने माकपला मोठे खिंडार पडले आहे.गेल्या दहा वर्षात कळवण तालुक्यात माकप वाढवण्यात महत्वाची भुमिका असलेल्या पाटलांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नितिन पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने माकपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सत्तेचाळीस वर्षांनंतर एटींविना निवडणूक
आठ वेळा आमदारकी आणि चार वेळा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री,राज्यमंत्री पद भूषविणाऱ्या ए.टी .पवारांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.1985 चा अपवाद वगळता पवार सलग आठ वेळा या मतदारसंघातून आमदार झाले.2014 च्या निवडणुकीत मतविभाजनाचा फटका बसल्याने अल्प मतांनी निसटता पराभव पवारांना पत्करावा लागला.2014 ची निवडणूक पवारांची शेवटची निवडणूक ठरली.यंदाच्या निवडणुकीत तब्बल 47 वर्षानंतर कळवणकर एटींविना निवडणुकीला सामोरे जातील.
मतदारसंघातील प्रश्न-
-ओतूर धरण दुरुस्तीचे रखडलेले काम
-रस्त्यांची झालेली चाळण,नागरिकांचे हाल
-नवीन उद्द्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी
-कुठलाही नवीन प्रकल्प नाही
-पुनद धरणातून सटाणा शहरासाठी सुरु असलेली पाईपलाईन
-कळवण च्या मेनरोड चा प्रश्न,पाच वर्षात बकाल अवस्था
-प्रशासकीय कार्यालये पुन्हा शहरात आणण्याचे हवेत विरलेले आश्वासन
विधानसभा निवडणूक 2014 निकाल
1) जीवा पांडु गावित, माकप -67795
2) ए.टी.पवार,राष्ट्रवादी काँग्रेस - 63,009
3) यशवंत गवळी, भाजप - 25457
4) भरत वाघमारे,शिवसेना,-9024
5)डी.के.गांगुर्डे,कॉग्रेस,-5720
लोकसभा निवडणूक -2019
डॉ.भारती पवार -भाजप-65545
धनराज महाले-राष्ट्रवादी-60180
जीवा गावित -माकप-58227
मतदारांची संख्या
पुरुष - 136550
महिला - 131002
एकूण मतदार - 267557
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.