Dhule News : शहरात महापालिकेच्या माध्यमातून, तसेच केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपये निधी आणून रस्ते, गटारांसह इतर विविध कामे करण्याचा लोकप्रतिनिधींकडून ढोल वाजविला जातो. मात्र, काही ठिकाणी अत्यंत गरज असताना तेथे यंत्रणांसह लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते. (Jalgaon Bad condition of road in front of important offices in city)
शहरातील साक्री रोड भागातील सामाजिक न्यायभवनासमोरील रस्त्याचीही हीच गत आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असताना याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशीच स्थिती इतर महत्त्वाच्या कार्यालयांसमोरील रस्त्यांचीही आहे. त्यामुळे एखादा मंत्री बोलवा अन् रस्त्याचे भाग्य उजळा, असा कार्यक्रम राबवावा का, असा प्रश्न यंत्रणेला आहे.
धुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून तसेच केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपये निधी आणला गेला. गेली पाच वर्षे याच कामांचा गाजावाजा पाहायला मिळाला. विशेषतः देवपूर भागात यातील बरीच कामे झाल्याचे पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र, देवपूरवासीयांचे किती हाल झाले हे सर्वश्रुत आहे.
शहराच्या इतर भागातही रोज कुठे ना कुठे भूमिपूजन, कामाच्या प्रारंभाचे कार्यक्रम होताना दिसतात. आता महापालिकेतील भाजपचा सत्तेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकराज आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांत प्रचंड कामे प्रशासकांच्या कार्यकाळातही मंजूर झाल्याचे पाहायला मिळाले. आता लोकसभा आचारसंहिता केव्हाही लागेल अशी स्थिती आहे.
त्यामुळे पटापट कामांना मंजुरी घेऊन कार्यादेश दिले गेले. ही कामे कधी पूर्ण होतील माहीत नाही. पण गाजावाजा भरपूर झाला. अर्थात कोट्यवधी रुपये निधीतून शहरात कामे झाली नाहीत असे नाही. पण ज्या ठिकाणी अत्यंत निकड आहे, अशा काही भागातील कामांकडे फारसे लक्ष घातले गेले नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. आजही अनेक कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारी नाहीत, जलवाहिन्या नाहीत. दुसरीकडे मात्र, त्याच-त्या ठिकाणी कामांचा भडिमार सुरू आहे. (latest marathi news)
इतरत्र कायम दुर्लक्ष
साक्री रोड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनासमोरील रस्त्याची अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे. विशेष म्हणजे सामाजिक न्यायभवनात रोज शेकडो नागरिकांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे, शाळा असल्याने विद्यर्थी-पालकांचे येणे-जाणे आहे.
शिवाय सिंचन भवन ते पुढे दक्षिणेकडे अनेक कॉलन्या, वसाहतीतील नागरिकांचा नेहमीचा वापर याच रस्त्याने आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही लोकप्रतिनिधी, संबंधित यंत्रणा पुढे येत नाही. अशीच स्थिती शहरातील काही शासकीय कार्यालयांसमोरील रस्त्यांची तसेच इतर रहिवासी भागातील रस्त्यांचीही आहे.
मंत्र्यांसाठी धावपळ
शहरात एखादा मंत्री-संत्री आला की संबंधित यंत्रणा रातोरात रस्ता तयार करून त्यांच्यासाठी पायघड्या टाकायला पुढे होते. काही दिवसांपूर्वी ज्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होती, त्या रस्त्यांचे भाग्य रातोरात उजळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मंत्र्यांना बोलवा आणि रस्ते दुरुस्त करून घ्या, असाच कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते.
उधळपट्टीकडे कानाडोळा
काही दिवसांपूर्वी शहराच्या देवपूर भागात जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन परिसरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरणाचा लेप देण्याचा प्रकार समोर आला. याप्रश्नी मनपा प्रशासकांकडून कारवाईचा इशारा दिला गेला खरा, पण या प्रकरणाचे पुढे काय झाले त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. एकीकडे अशी उधळपट्टी होत असताना जिथे गरज आहे, तिथे मात्र छदाम खर्च होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.