Dhule News : महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रात किमान खडी-मुरूम टाकून रस्ते दळणवळणयोग्य करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकतीच एक कोटी रुपयांची तरतूद केली. यातून या कामांना सुरुवात झाली आहे. या रस्तेकामांसाठी या भागातील माजी नगरसेवक, विविध पक्ष-संघटनांसह धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनीही मनपा प्रशासनाकडे मागणी केली होती. (Dhule Municipal Corporation started work construction roads)
महापालिकेच्या हद्दवाढ दहा गावांमध्ये रस्त्यांची सुविधा नसल्याने विशेषतः हद्दवाढीत नव्याने वसलेल्या कॉलन्यांमध्ये रस्ते नसल्याने या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातही पावसाळ्यात या भागात अक्षरशः चिखल होतो. टोलेजंग घरे, इमारती अन् रस्त्यांवर चिखल असे चित्र पाहायला मिळते.
चिखलामुळे वाहने काढणेही मुश्कील होते. त्यामुळे या भागात किमान खडी-मुरमाचे रस्ते करावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांसह त्या-त्या भागातील तत्कालीन नगरसेवक, विविध पक्ष-संघटनांकडून वारंवार झाली. मात्र, विविध नियम दाखवून तत्कालीन अभियंते, अधिकाऱ्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे यंदाही पावसाळ्यापूर्वी हे काम होऊ शकले नाही. दरम्यान, मागण्या व तक्रारींचा रेटा पाहता मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी महासभेत हा विषय घेऊन हद्दवाढ क्षेत्रात खडी-मुरमाच्या रस्त्यांसाठी एक कोटीची तरतूद केली व प्रश्न मार्गी लावला. ही कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार काही भागात खडी टाकून रस्ते कामास प्रारंभ झाला आहे.
आमदार पाटलांचे पत्र
हद्दवाढ क्षेत्रात काळी माती असल्याने काँक्रिट व डांबरीकरणाचे रस्ते वारंवार उखडून जातात. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांवर त्वरित मुरूम व खडी टाकून दुरुस्ती करण्याची मागणी वलवाडीतील द्वारकानगर तसेच इतर कॉलनीतील रहिवाशांनी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार आमदार पाटील यांनी मनपा आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांना पत्र देऊन कॉलनी परिसरातील रस्ते दुरुस्तीची मागणी केली होती. (latest marathi news)
अखेर काम सुरू
दरम्यान, महापालिकेतर्फे खडी-मुरूम टाकून रस्ते कामास प्रारंभ करण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार रस्त्यावर खडी टाकण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ६) चंद्रवेल फेज-१ व द्वारकानगर येथे प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.
या वेळी माजी सरपंच राजेंद्र (भटू) चौधरी, युवक काँग्रेसचे आबा पाटील यांच्यासह पांडुरंग मोरे, संजय पिंगळे, स्वातीबाई निकम, आशाबाई रावल, सागर मोरे, श्री. सोनवणे, श्री. भावसार, सागर माळी, कामिनी पाटील, सुरेखा येवले, नंदूबाई पाटील, संगीता पाटील, सुनीता देवरे आदी उपस्थित होते.
काही ठिकाणी लाइनआउट
हद्दवाढ क्षेत्रात खडी-मुरमाचे रस्ते करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर काही ठिकाणी काम सुरू करण्यात आले, तर इतर काही ठिकाणी कामासाठी लाइनआउट देण्याचे काम सुरू असल्याचे मनपातील सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले यांनी सांगितले. हद्दवाढ क्षेत्रातील सुमारे २०-२५ कॉलन्यांमध्ये सध्या ही कामे करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.