नेर (धुळे) : शासनाने १८ ते ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी (Vaccination) ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली असून नेर (ता. धुळे) येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. मात्र नोंदणी करताना गावाचा पिन क्रमांक (Pin code) टाकल्यानंतरही कोणतेही केंद्र दाखवत नाही. यामुळे मंगळवारी (ता.११) लसीकरणासाठी गर्दी केलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. अखेर नोंदणी नसल्यामुळे लसीकरण होऊ शकले नाही. (corona vaccination online ragistetion not show center)
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. परंतु गर्दी करूनही अनेकांना याचा फायदा झाला नाही. सध्या प्रशासनाच्या नियमानुसार लसीकरण करून घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून घेणे बंधनकारक असल्याने या ठिकाणी गावातील नागरिकांपेक्षा बाहेर गावातील नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केल्याची संख्या जास्त होती. नेर गावाचा पिन क्रमांक टाकल्यानंतर लसीकरण केंद्रच दर्शवीत नाही. तर धुळे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर नेर गावाचे लसीकरण केंद्र दाखविले जाते. परंतु ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील व्यक्ती अवघ्या दोन मिनिटांत नोंदणी करून ठरलेला कोटा पूर्ण होतो. त्यामुळे स्थानिक नेर गावातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
माझी लस माझ्या गावी उपक्रम
ग्रामस्थ ऑनलाइन नोंदणीबाबत अनभिज्ञ ग्रामीण भागातील ग्रामस्थ अशिक्षित असून त्यांना ऑनलाइन नोंदणीबाबत अडचणी येत आहे. यामुळे तेथील उपस्थित डॉक्टर, कर्मचारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तत्काळ आरोग्य अधिकारी डॉ. सुनील महाले यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता सूचनेप्रमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर सूचना फलक लावत त्यावर प्रशासकीय नियमाप्रमाणे ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच लस मिळेल असे स्पष्ट केल्याने गर्दीतील नियमात बसणाऱ्या साधारणतः दहा ते बारा नागरिकांनाच लस दिली. यामुळे उर्वरित नागरिकांनी नाराजी व्यक्त करत ‘माझी लस माझ्या गावी’ हा उपक्रम राबवावा, अशी प्रशासनाला विनंती केली.
ऑनलाइन चूक दुरुस्तीची मागणी
नेर येथील ग्रामस्थांना मोबाईल ॲपद्वारे लसीकरण नोंदणी करताना मोठ्या अडचणी येत आहेत. यात राज्य निवडताना जिल्हा निवडावा लागतो. तदनंतर आपल्या गावाचा पिनकोड नमूद करावा लागतो. परंतु नेर गावाचा पिनकोड टाकल्यानंतर केंद्रच दर्शविले जात नसल्यामुळे ग्रामस्थांची नोंदणीच होत नाही. ऑनलाइन प्रणालीतील ही चूक दुरुस्त करावी अन्यथा ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ऑनलाइन नोंदणी करणे आम्हाला शक्य होत नाही. प्रशासनाने ऑफलाइन नोंदणी सुरू करावी. माझी लस माझ्या गावी हा उपक्रम राबवून गावातील अशिक्षित नागरिकांना या लसीकरणाचा मोठा फायदा होईल.
- नामदेव बोरसे, ग्रामस्थ नेर
शासनाच्या नियमानुसार व वरिष्ठांच्या आदेशान्वये ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाणार नाही. यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात अरेरावी करू नये. येथील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विना कारणास्तव गर्दी करू नये. नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे व शारीरिक अंतर ठेवावे.
- डॉ. सुनील महाले, प्राथमिक आरोग्य केंद्र, नेर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.