धुळे : स्वच्छ भारत मिशन (swachh bharat mission) अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांची कामे अपूर्ण ठेवत ५२ लाख ६८ हजार रुपयांच्या अनुदानाचा अपहार (Fraud) केल्याप्रकरणी अजंग (ता. धुळे) येथील तत्कालीन ग्रामसेविकेसह महिला सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (personal toilets under swachh bharat mission scam ex sarpancha and gramsevak fir)
अजंग- कासविहीर (ता. धुळे) ग्रामपंचायतीमार्फत २०१६-१७ मध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या निकृष्ट कामांसह गैरव्यवहाराच्या चौकशीची तक्रार दिनेश माळी (रा. अजंग) यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. चौकशीत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. शासन निर्णयानुसार वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहनपर बारा हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे होते. कंत्राटदार वा ठेकेदार यांना सदरील रक्कम परस्पर अदा केली जाऊ नये, असे निर्देश दिले होते.
खातेदारांऐवजी अन्यच खात्यात रक्कम
अजंग ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांच्या दप्तराची तपासणी केली असता, तत्कालीन ग्रामसेविका सारिका परदेशी (रा. आदर्श कॉलनी, चावरा हायस्कूलजवळ, धुळे) व सरपंच भीमाबाई भदाणे (रा. अजंग, ता. धुळे) यांनी शौचालयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न करता ग्रामपंचायतीच्या देना बँक शाखेत (खोल गल्ली, धुळे) येथे जमा करून त्या खात्यावरून रेखा क्रिएटर्स, अजंग नावाच्या ठेकेदाराच्या सेंट्रल बँक, मुकटी (ता. धुळे) येथील खात्यावर अदा केली.
२०५ शौचालयांचे कामे अपुर्ण
तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका यांनी शौचालय बांधकामासाठी कोणत्याही निविदा प्रक्रियेचा अवलंब केला नाही. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले नाही, असेही चौकशीत आढळले. तत्कालीन ग्रामसेविका व सरपंच यांनी रेखा क्रिएटर्स या ठेकेदाराला ५२ लाख ६८ हजार रुपये ४३९ शौचालयांच्या बांधकामासाठी दिले. पण, चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर २०१७ ला अजंग-कासविहीर ग्रामपंचायत हद्दीत पाहणी केली असता, २०५ शौचालयांची कामे अपूर्ण आढळली. अनेक शौचालयांना दरवाजे नव्हते. शिवाय, शोषखड्डा, छत, पाइप न जोडणे असे आढळले. वास्तविक शौचालयांची कामे पूर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतर रक्कम अदा करणे आवश्यक होते. मात्र, ग्रामसेविका व सरपंच यांनी तसे केले नाही.
विस्तार अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा
२०१६ ते २०१८ काळात तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेविका यांनी शासन नियम, अटी-शर्तींचे पालन न करता ४३९ शौचालयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा करणे बंधनकारक असतानाही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रेखा क्रिएटर्स या खासगी ठेकेदाराच्या खात्यावर जमा करून अधिकाराचा दुरुपयोग केला. याप्रकरणी धुळे पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी भगवान पाटील यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अधिकाराचा दुरुपयोग, शासकीय रकमेचा अपहार, दिशाभूल, तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.