निजामपूर (धुळे) : येथील आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. शरदचंद्र शाह यांनी त्यांचे वडील जगन्नाथ कडवादास शाह यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयासाठी सात लाख रुपये देणगीसह स्वमालकीची पाच एकर जमीन दान करून पुन्हा एकदा दानशूरतेची प्रचीती दिली. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष जे. के. शाह यांनी सर्वाधिक सुमारे ३५ वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली व संस्थेला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या स्मृतीनिमित्त भरीव देणगीसह साक्री-नंदुरबार महामार्गालगतच्या पाच एकर जमिनीचे त्यांनी विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले आहे.
निजामपूर- जैताणेसह माळमाथा परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ॲड. शाह यांची ओळख आहे. यापूर्वीही त्यांनी ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आदर्श विद्यार्थी विकास मंचाला ७५ हजारांची देणगी दिली होती, तर त्यांच्या अर्धांगिनी तथा माजी सरपंच कलावतीबेन शाह यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी नुकतीच २५ हजारांची देणगी दिली. शिक्षण, सहकार, समाजकारण व राजकारण आदी क्षेत्रात ॲड. शाहांनी मोलाचे योगदान दिले आहे. निजामपूरचे माजी सरपंच, साक्रीचे माजी पंचायत समिती सदस्य व पांझराकान सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे.
महाविद्यालयाचे नामकरणही होणार
येत्या २४ फेब्रुवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श कला महाविद्यालयाचे नामकरण ‘जगन्नाथ कडवादास शाह आदर्श महाविद्यालय’ असे होणार असून, नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय झाला. या नामकरण सोहळ्यास खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती असेल, असे ॲड. शाह यांनी सांगितले. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालकांसह प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, प्राचार्य राजेंद्र चौधरी व प्राध्यापक-कर्मचारी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
आगामी काळात महाविद्यालयात वाणिज्य व विज्ञान शाखेसह पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस असून, ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या पाल्यांना केजी-टू-पीजीपर्यंतचे शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक हेतू आहे.
-ॲड. शरदचंद्र शाह, अध्यक्ष, जे. के. शाह आदर्श महाविद्यालय
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.