तळोदा (नंदुरबार) : मांडवी (ता. धडगाव) या गटग्रामपंचायत परिसरात मोबाईल टॉवर नसल्याने (No mobile tower mandvi village) येथील ग्रामस्थांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा (Online education) कशा द्याव्यात, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांना निवेदन दिले. मात्र त्यानंतरही या समस्येवर अद्याप उपाय निघाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (mandavi-village-no-mobile-tower-and-creat-student-online-education-issue)
मांडवी (ता. धडगाव) या गावाची तालुक्यातील सर्वांत मोठ्या गटग्रामपंचायतीत गणना होत असून, मोबाईल टॉवर नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेटवर्कअभावी ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी वारंवार बँकेत चकरा माराव्या लागतात, तरी बँकेचे काम वेळेवर होत नाही. त्यामुळे बँक असून नसल्यासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. मात्र मोबाईल रेंजअभावी विद्यार्थीही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहेत. तसेच याठिकाणी टॉवर उभारण्याबाबत ग्रामस्थांकडून वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि शासनदरबारी निवेदने दिली आहेत. तरी कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही, असा आरोप मांडवी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
बीएसएनएल टावर उभारणीची मागणी
दरम्यान, या गावात २०१७ मध्ये एका खासगी कंपनीकडून टॉवर बांधण्याच्या कामाला सुरवात झाली होती; पण मांडवी व परिसरातील अनेक गावे वन विभागात येत असल्याने ते काम वन विभागाने थांबविल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या सोडविण्यासाठी २०१७ मध्ये ग्रामसभा घेत त्या वेळी गावात बीएसएनएल मोबाईल टॉवरची मागणी संदर्भात ठराव मंजूर केला आहे. गावातील या समस्येबाबत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांनाही अर्ज देत अवगत केले आहे. त्यामुळे आता बीएसएनएल या सरकारी कंपनीचे टॉवर तरी याठिकाणी उभारावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मांडवी बुद्रुक येथे मोबाईल टॉवर नसल्यामुळे गावातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेकांना विद्यापीठाच्या परीक्षेला मुकावे लागले आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासनदरबारी दाद मागितली आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.
- पंडित पराडके, रहिवासी, मांडवी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.