धुळे : कोरोना विषाणूंमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी शैक्षणिक शुल्क माफ करावे, असे आवाहन कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले. (dhule-collector-sanjay-yadav-meet-school-collage-principal-and-child-free-education)
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना महामारीत पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी स्थापन जिल्हास्तरीय कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थाचालक, प्राचार्य व मुख्याध्यापकांशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, जिल्हा परिवीक्षा अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षणगृह अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, सदस्य प्रा. वैशाली पाटील, डॉ. सुदाम राठोड, ॲड. मंगला चौधरी, मीना भोसले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की कोरोना विषाणूंमुळे अनेक बालकांवर एक किंवा दोन पालक गमावण्याची वेळ आली आहे. या स्थितीत प्रत्येकाने संवेदनशील राहत अशी बालके व त्यांच्या कुटुंबांप्रती मदतीची भूमिका घ्यावी. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेशासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्था, दानशूरांनी पुढे यावे. दीर्घकालीन मदतीसाठी नियोजन करावे. पीडित महिला, तरुण- तरुणींना मुख्यमंत्री महा- आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. त्याचे नियोजन या विभागाने करावे.
शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी
पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले, की अशा कुटुंबातील तरुण- तरुणींना पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. महापालिकेचे आयुक्त शेख यांनी शहरातील पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सरला पाटील यांनी अशा विद्यार्थ्यांचा बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च करू, असे सांगितले. अशा विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून विद्यालयातर्फे मदत करण्यात येते, असे कनोसा हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर मोनिका, कमलाबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा जोशी, सिंधूरत्न हायस्कूलच्या उपप्राचार्या शालिनी मंदान, पोद्दार विद्यालयाचे भूषण उपासनी आदींनी सांगितले.
जिल्ह्यात ३५० वर पीडित बालके
श्री. भदाणे यांनी सांगितले, जिल्ह्यात कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ३५७, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २० आहे. अन्य बालकांची माहिती संकलित होत आहे. या बालकांना मदतीसाठी दानशूरांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे (दूरध्वनी : ०२५६२- २२४७२९), बालकल्याण समिती, मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा. बालकांच्या समस्यांसाठी टोल फ्री १०९८, तसेच ८३०८९ ९२२२२, ७४००० १५५१८ या मोबाईलवर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.