धुळे जिल्‍ह्‍यातील ही दोन गावे ५ सप्टेंबरपर्यंत लॉक!

lockdown
lockdown
Updated on

निजामपूर : माळमाथा परिसरातील निजामपूर- जैताणे या दोन्ही गावांमध्ये आतापर्यंत ७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील काही बरे झाले आहेत. तर काहींवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर येथील दोन्ही ग्रामपंचायत सभागृहांमध्ये साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता २४ ऑगस्टपासून पुढील चौदा दिवस दोन्ही गावे बंद ठेवण्याचे आदेश यावेळी तहसीलदारांनी दिले.

जैताणे ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीस गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी जे. पी. खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ, जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी उपसरपंच नवल खैरनार, पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पवार, डॉ. सपना महाले, सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विक्रमसिंह तंवर, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, लिपिक यादव भदाणे, योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागुल, भिका न्याहळदे, व्यापारी अनुप रेलन, धनंजय न्याहळदे, युवराज शिरोळे, पंकज सोनवणे आदींसह रेशन दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

असे लागू केले नियम
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदारांनी २४ ऑगस्टपासून दोन्ही गावांमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन यावेळी जाहीर केला. भाजीपाला विक्री, किराणा दुकाने व कृषी सेवा केंद्रे फक्त सकाळी ९ ते १ ह्या वेळेतच सुरू राहतील. दुध विक्रेत्यांना सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेतच दूध विक्रीस परवानगी आहे. बँकांचे व्यवहार व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरू राहतील. तर दवाखाने व मेडिकल दुकाने यांना वेळेचे कोणतेही बंधन नसेल. इतर सर्व दुकाने १४ दिवस बंद राहतील. सोमवारपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी असेल. 

मास्‍क बंधनकारक
फिजिकल डिस्टंसिंगसह मास्क व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत निजामपूर-जैताणे येथेच स्वतंत्र स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही तहसीलदार चव्हाणके यांनी बोलताना सांगितले. कृषी व किराणा दुकानदार, दूध व भाजीपाला विक्रेते यांनी स्वतःही मास्क वापरावा व मास्क न वापरणाऱ्या ग्राहकांना प्रतिबंध घालावा, अशी सूचना त्यांनी केली. तर सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना बँकेच्या बाहेर तात्काळ बॅरिकेटिंग करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामपंचायत प्रशासनासह पोलीस प्रशासनास सजग राहण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. 


ःसंपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.