Photos: शहीद जवान निलेश महाजन यांना अखेरची सलामी

Martyr soldier News : शहीद जवानाचे शनिवारी (ता. 24) रात्री गुवाहाटी रुग्णालयात उपचार घेतांना निधन झाले. त्यांना सेवा बजावत असताना हनुवटीवर गोळी लागली होती.
martyr soldier nilesh mahajan
martyr soldier nilesh mahajanmartyr soldier nilesh mahajan
Updated on

सोनगीर ः येथील शहीद जवान निलेश अशोक महाजन (Martyr Soldier Nilesh Ashok Mahajan) यांना बुधवारी (ता. 28) दुपारी बाराच्या सुमारास साश्रूनयनांनी अखेरची सलामी देण्यात आली. फुलांच्या माळांनी सजवलेला ट्रॅक्टर, पुढील भागात जवानाचे भव्य फलक, ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत एका चौथऱ्यावर तिरंगा व फुलांच्या माळांनी झाकलेले पार्थिव, घराघरातून पार्थिवावर फुलांचा वर्षाव, पुढे फौजी, एनसीसीची कवायत, देशभक्तीपर गीत गात पुढे चालणारे तीन वेगवेगळे बँड, शेकडो हातांनी धरलेला तब्बल दोनशे मीटर लांबीचा तिरंगा, अंत्ययात्रेला कडेकरून मार्गक्रमण करणारे जवान, मार्गावरील रांगोळ्या व शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार (Funeral) हे विलोभनीय दृश्य याचि देही याचि डोळा पहाण्यासाठी सोनगीरसह परिसरातील हजारो महिला व मुलाबाळांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

(dhule martyr soldier nilesh mahajan funeral in songir)

शहीद जवानाचे शनिवारी (ता. 24) रात्री गुवाहाटी रुग्णालयात उपचार घेतांना निधन झाले. त्यांना सेवा बजावत असताना हनुवटीवर गोळी लागली होती. जवानाचे पार्थिव गुवाहाटीहून विमानाने मुंबईला मंगळवारी (ता. 27) रात्री साडेनऊला आले. तेथे सलामी देण्यात आली. बुधवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास पार्थिव जवानाच्या येथील रहात्या घरी आणले गेले. पार्थिव घरात नेऊन नातेवाईकांनी दर्शन घेतले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरवर पार्थिव ठेवून पावणे अकराच्या सुमारास अंतयात्रेला सुरूवात झाली. तेथून पोलिस ठाणेसमोरून गावाकडे एन. जी. बागूल हायस्कूलच्या पाठीमागून एकलव्य चौक, पुढे इंदिरानगर साईबाबा मंदिर व पुढे मरीमाता मंदिराकडून सोमेश्वर मंदिरासमोरील स्वामी नारायण मंदिराजवळील मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कार ठिकाणी अंतयात्रा पोहचली. सजवलेल्या चबूतऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले. शहीद जवानाचे चुलत भाऊ योगेश महाजन याने अग्नीडाग दिला. यावेळी राष्ट्रगीत झाले. जवानाला उपस्थितांनी निरोपाची सलामी दिली. त्यावेळी आकाशालाही गहिवरून आले. ढग भरून आले मात्र तो बरसला नाही.

शासकीय इतमाम सलामी

जवानाला शासकीय इतमाम देतांना धुळ्यातील विशेष पोलीस पथकाने बिगूल वाजवून सलामी दिली. व आकाशात बंदूकीच्या तीन फैरी झाडल्या. त्याचवेळी महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेटने मानवंदना दिली.

ग्रामस्थात देशभक्तीचे स्फुरण

आपल्या लाडक्या जवानाला निरोप देताना व्यापारींनी उस्फूर्त बाजारपेठ बंद ठेवली. तीन बँडपथक स्वतःहून हजर झाले. तरूणांनी झेंडे, फुले आणून वाटली. व नियोजनात मोठी मदत केली. घरोघरी रांगोळ्या काढण्यात आल्या. छतावरून पार्थिवावर फुलांचा वर्षाव झाला.

ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट नियोजन

सरपंच रुखमाबाई ठाकरे, उपसरपंच विजूबाई बडगुजर व ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे व ग्रामपंचायत सदस्यांनी अंतयात्रेचे उत्तम नियोजन केले. अंतयात्रा मार्गाला जोडणारे अन्य मार्गांना बॅरिकेटस लावून बंद केले. रस्ता दुरुस्ती, वाहन पार्किंग व्यवस्था, चबूतरा एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीने अंत्यसंस्कारालगतची एक एकर जमीन दिली असून याजागी स्मारकासह एक विस्तीर्ण बगीचा बनविण्यात येणार आहे.

दोनशे मीटर तिरंगा

तरुणांनी सुमारे दोनशे मीटर लांबीचा तिरंगा बनवून एक आदर्श निर्माण केला. हजारो हात तिरंगा घेऊन चालत होते. त्यात महिलांचाही समावेश होता. तिरंगाला स्पर्शासाठी अहमहमिका लागली होती. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असताना काही पाकिटमारही गर्दीत शिरले. काहींचा खिसा साफ केला. एका पाकिटमाराला पोलिसांनी पकडले. मात्र एका देशभक्ताला निरोप देत असतांनाही चोरी करण्याचा मोह कसा होतो याचे आश्चर्य वाटते.

गर्दीचा उच्चांक -

सकाळी साडेनऊची वेळ दिली असताना साडेसातपासूनच जवानाच्या घराजवळ गर्दी जमू लागली. त्यामुळे पोलिसांना धावपळ करावी लागली. अंत्यसंस्काराठिकाणी शासकीय इमारतीसह तीनशे मीटर अंतरावरील टेकडी, संपूर्ण आवार गर्दीने फुलून गेला होता. मात्र चोख बंदोबस्त होता. एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, सोनगीर महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनीही अंतयात्रा मार्गावर मानवंदना दिली. आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी जलश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक चिण्मय पंडीत, तहसीलदार गायत्री सैंदाणे, प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे, भाजयुमोचे राम भदाणे, आमदार कुणाल पाटील यांचे प्रतिनिधी, सरपंच रुखमाबाई ठाकरे, अरविंद जाधव आदींनी श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.