धुळे ः महापालिकेत स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. या तपासणीत तब्बल ६६ कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच नसल्याचे आढळून आले. अर्थात यातील बहुतांश कर्मचारी लेटलतिफ होते अथवा काहींनी दांडी मारलेली असण्याचीही शक्यता आहे. हजेरी रजिस्टरमधील गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात आहे.
कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्यानंतर व सर्वच शासकीय विभाग सुरळीतपणे सुरू झाल्यानंतरही महापालिकेची लेटलतिफची परंपरा कायम आहे. स्थायी समिती सभापती बैसाणेनी मंगळवारी सकाळी केलेल्या अचानक पाहणीतून ही स्थिती पुन्हा अधोरेखित झाली.
तब्बल ६६ कर्मचारी
सभापती बैसाणे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर मागविले. यात विविध विभागातील तब्बल ६६ कर्मचाऱ्यांची स्वाक्षरीच नसल्याचे आढळून आले. अर्थात कर्मचारी एकतर लेटलतिफ होते अथवा ते त्या वेळेपर्यंत महापालिकेत फिरकलेलेच नव्हते. काही कर्मचारी नंतर सभापती बैसाणे यांच्या दालनात येऊन आपापल्या हजेरीबाबत स्पष्टीकरण देत होते. या ६६ कर्मचाऱ्यांमध्ये मालमत्ता करवसुली विभागाचे १८, तर बांधकाम विभागाच्या १४ कर्मचाऱ्यांसह आरोग्य, आस्थापना, लेखा, प्रकल्प, नगररचना, बाजार, रेकॉर्ड आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अहवाल आयुक्तांकडे
कर्मचाऱ्यांच्या या अनुपस्थितीचा अहवाल आयुक्त अजीज शेख यांच्याकडे ठेवल्याचे आस्थापना विभागप्रमुख रमजान अन्सारी यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्त शेख अशा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष असेल. दरम्यान, नेहमीप्रमाणे सर्वेक्षण, स्पॉट व्हिजिट, फिल्ड वर्कसाठीच बाहेर होतो, अशी विविध कारणे संबंधित कर्मचाऱ्यांकडून पुढे येतील, हेही तेवढेच खरे.
वाचा- पहाटेच कुटूंब शेतात; बंद घरातून धूराचे लोट
पाचच दिवस काम तरीही...
राज्य शासनाने शासकीय कामासाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून केवळ पाच दिवसच अधिकारी- कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते. तरीही महापालिकेच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. कोरोनामुळे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सव्वासहा अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. यात दुपारी सव्वा ते दोनदरम्यान लंच ब्रेक आहे. कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे थम मशिनद्वारे हजेरीही सध्या बंद आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.