विहिरीत पडलेल्या बिबट्याची शक्कल लढवित केली सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची शक्कल लढवित केली सुटका
Updated on

म्हसदी : मोगरपाडा (ता. साक्री) शिवारात पहाटे शिकारीच्या नादात बिबट्याची जोडी विहिरीत पडली. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर वन विभागाला माहिती देण्यात आली. अवघ्या पावणेदोन तासांच्या अंतरावर वन विभागाने विहिरीत सोडलेल्या शिडीचा आधार घेत बिबट्याच्या जोडीने वनाकडे धूम ठोकली. बिबटे वनक्षेत्रात पसार झाल्यावर वनकर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 


मोगरपाडा गावापासून अवघ्या पाचशे मीटरवरील शिवारात पहाटे पुंडलिक बागूल यांच्या (गट क्रमांक ७८) शेतातील विहिरीत सावजाचा पाठलाग करताना बिबट्याची जोडी विहिरीत पडली. सकाळी श्री. बागूल यांना शेतात गेल्यावर बिबट्याची डरकाळी ऐकू आली. वन विभागाला माहिती दिल्यावर बिबट्याच्या जोडीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक माणिक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, पिंपळनेर वन विभागाचे वनक्षेत्रपाल अरुण माळके, वनपाल बच्छाव, आर. डी. मोरे, वनरक्षक दीपक भोई, योगेश भिल, देवा देसाई, काळू पवार, सुमीत कुमार, सागर सूर्यवंशी, तानाजी कुवर, दिलीप पारोळे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले.

वन विभागाने सकाळी नऊला विहिरीत दोन शिड्या सोडल्या. वनकर्मचारी व ग्रामस्थांनी बिबट्याच्या जोडीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तीन शिड्या एकमेकांना बांधून तयार केलेली एकसंध शिडी विहिरीत सोडली. सकाळपासून बिबट्याच्या जोडीने शिडीची शेवटची पायरी पार केलेली नव्हती. चार-पाच वेळा विहिरीत धपकन पडल्याचा आवाज झाला होता. तैनात वनकर्मचाऱ्यांनी तो दुरून ऐकला आणि नंतर असा कुठलाच आवाज आला नाही. दुपारी एकला एक व अन्य एका बिबट्याने पावणेतीनला शिडी चढत वनक्षेत्राकडे धूम ठोकली. 

मोगरपाडा शिवारात विहिरीत पडलेले बिबटे नर-मादी होते. शिकार करताना बिबट्याची जोडी विहिरीत पडली. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. बिबटे वनक्षेत्रात सुखरूप पसार झाले. 
-अरुण माळके, वनपरिक्षेत्राधिकारी, पिंपळनेर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.