खडसेंचा घणाघात...पक्षाने मला फसवले, पाठीत खंजीर खुपसला !

खडसेंचा घणाघात...पक्षाने मला फसवले, पाठीत खंजीर खुपसला !
Updated on

जळगाव  : मंत्रिमंडळातून राजीनामा घेतल्यापासून विधानसभेसाठी तिकीट कापणं आणि आता विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारण्यापर्यंत पक्षाकडून केवळ खच्चीकरण सुरू आहे. आताही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीचे आश्‍वासनही मिळाले होते. मात्र, ऐनवेळी भलतीच नावे समोर आली. उमेदवारी नाकारल्याची खंत अजिबात नाही, पण आश्‍वासन देऊन फसवणूक केल्याचा पक्षावर राग आहे, अशा शब्दांत माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रदेश भाजप नेतृत्वावर घणाघात केला. खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत खडसेंनी या सर्व प्रकाराबाबत आपण पक्षातील वरिष्ठांची चर्चा करून नंतर राजकीय भूमिका जाहीर करू, असेही सांगितले. 

विविध आरोपांवरून मंत्रिमंडळातून राजीनामा घेतल्यापासून खडसे भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात तर पुनर्वसन केलेच नाही, वरून विधानसभेत तिकीट कापले आणि आता विधान परिषदेत घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ऐनवेळी डावलल्यामुळे संतप्त झालेल्या खडसेंनी प्रदेश नेतृत्वावर पुन्हा निशाणा साधत आक्रमक पवित्रा घेतला. 

जाणीवपूर्वक खच्चीकरण 
या मुलाखतीत खडसे म्हणाले, की मंत्रिपदी असताना माझ्यावर विविध आरोप झाले, त्यासाठी मी स्वतः राजीनामा दिला. चौकशीनंतर तीन महिन्यांत मंत्रिमंडळात घेऊ, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण, वेगवेगळ्या आरोपांच्या चौकशीतून मुक्त झाल्यानंतरही मंत्रिमंडळात घेतले नाही. त्याची कारणे मी वारंवार विचारली. विधानसभा निवडणुकीतही तिकीट नाकारले, त्याबाबतही पक्षाला विचारणा केली. परंतु, उत्तर मिळालेच नाही. राज्यसभेवर जाण्यास कधीच इच्छुक नव्हतो. पण, पक्षादेश म्हणून ते मान्य केले. मात्र, राज्यसभेवरही संधी दिली गेली नाही. त्याचवेळी विधान परिषदेवर घेण्याचे आश्‍वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिले होते. पण यावेळीही माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंना डावलण्यात आले. 

निष्ठावंतांना का डावलतांय? 
पक्षासाठी चाळीस वर्षे आम्ही खस्ता खाल्ल्या, दगडधोंडे अंगावर घेतले. आणीबाणीत कारागृहात गेलो. मर्यादित समाजाचा पक्ष तळागाळात पोचवून बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली. त्यावेळच्या नेत्यांसह माझेही त्यात काहीतरी योगदान असेल की नाही? अशा निष्ठावंतांना डावलण्यात येत असेल, तर काय उपयोग? त्याची कारणे तरी पक्षाने आम्हाला दिली पाहिजेत, अशी अपेक्षा खडसेंनी व्यक्त केली. 

पाठीत खंजीर खुपसला 
उमेदवारीबाबत दगाफटका झाल्याचे सांगताना खडसे म्हणाले, की विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावांवर प्रदेश संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. माझ्यासह पंकजा, बावनकुळे, विनोद तावडे, राम शिंदे अशा अनेकांची इच्छुक म्हणून नावे समोर आली. उमेदवार निश्‍चित होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत आमच्याच नावांची शिफारस केली असून उमेदवारी नक्की मिळेल, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, 8 मेस जाहीर नावे समोर येताच, आम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण, प्रदेश संसदीय मंडळाच्या बैठकीत यापैकी कोणत्याही नावाचा उल्लेख झाला नव्हता. म्हणजे, शेवटपर्यंत आम्हाला मूर्ख बनविण्यात आले. हा दगाफटका आहे, पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात ते यालाच... हे खंजीर कुणी खुपसले हे जनतेला माहीत आहे, असेही खडसे म्हणाले. 

मार्चमध्येच ठरले हे उमेदवार 
विधान परिषदेसाठी ज्या चार जणांची नावे जाहीर झाली, त्याच दिवशी हे चारही उमेदवार मुंबईत सर्व कागदपत्रांसह कसे पोचले? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्यातील तारीख कशी? असे प्रश्‍न उपस्थित करत हे उमेदवार मार्चमध्येच निश्‍चित झाले होते, असा आरोप खडसेंनी केला. या प्रकाराला राष्ट्रीय नेत्यांची मान्यता आहे का, या प्रश्‍नावर खडसे म्हणाले, दिल्लीतील नेत्यांना चुकीची माहिती देऊन हे प्रकार सुरू आहेत. त्यांची अशा कृत्याला मान्यता असेल, असे मला वाटत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.