जळगाव :शहरातील जोशीपेठ हा दाटवस्ती तसेच नेहमी गजबजलेला परिसर आहे. त्यात हा महापौरांचा प्रभाग असून या प्रभागात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी जोशीपेठेतील 26 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे शहरासह सर्व यंत्रणा हादरली. त्यामुळे महापौरांनी रात्रीच जोशीपेठमध्ये धाव घेत महापालिका यंत्रणेने परिसर निर्जंतुकीकरण करायला सुरवात केली. तसेच आरोग्य यंत्रणेतर्फे परिसरातील घरांची तपासणीही सुरू झाली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत साडेचार हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कातील 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर चौधरी, डॉ. राम रावलानी, डॉ. विजय घोलप, डॉ. संजय पाटील, शनीपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. डी. ससे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तसेच आज महापालिकेच्या दवाखाना विभागाच्या पथकाने जोशीपेठमध्ये नागरिकांची तपासणी मोहीम सुरू केली.
परिसर निर्जंतुकीकरण
जोशीपेठेत नागरिक भयभीत झालेले असल्याने महापौरांनी रात्रीच परिसर निर्जंतुक करण्यासाठी महापालिकेचे पथक बोलाविले. संपूर्ण परिसरात रात्री औषध फवारणी करण्यात आली. दीडपर्यंत स्प्रिंकलर मशिन आणि 4 लोकांकडून फवारणी पंपाद्वारे मोहीम राबविली.
पोलिस बंदोबस्त; परिसर सील
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरल्याने गर्दी केली होती. महापौरांनी तत्काळ शनीपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना संपर्क केले. तत्काळ पोलिसांनी संपूर्ण परिसरात गस्त घालून नागरिकांना घरात पाठविले. तसेच परिसरातील गल्लीसह इतर परिसर रात्रीच बॅरिकेट आणि लाकडी बांबू लावून सील करण्यात आला.
"तो' डॉक्टरही "क्वारंटाइन'
"पॉझिटिव्ह' रुग्णाशी संबंधित असलेल्या 11 जणांना रात्री तपासणीकामी रुग्णालयात पाठविण्यात आले. पॉझिटिव्ह रुग्णाने 3 दिवस परिसरातील एका डॉक्टराकडे उपचार घेतले असल्याने त्यांना देखील क्वारंटाइन होण्याचे महापौरांनी सांगितले. रुग्णाच्या संपर्कात असलेल्या रात्री गच्चीवर लपून बसलेल्या 5 जणांना मंगळवारी सकाळी तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
क्लिक कराः जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप
साडेचार हजार नागरिकांची तपासणी
महापालिकेच्या दवाखाना विभागाचे 13 पथकाद्वारे तपासणी मोहिमेला सकाळी सुरवात केली. तपासणी मोहिमेत 856 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले तर 4 हजार 474 नागरिकांची कोरोना संदर्भात प्राथमिक तपासणी करण्यात आली.
नागरिकांनी केला पथकास विरोध
"कोरोना'बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरात आज सकाळपासूनच आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण व तपासणीसाठी निघाले. मात्र, बागवान मोहल्ला व अन्य काही गल्ल्यांमध्ये त्यांना विरोध करण्यात आला. अनेकांनी हे कर्मचारी समोर येताच दरवाजे लावून घेतले, तर काहींनी तपासणी करण्यासही विरोध केला. नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या नागरिकांची समजूत काढली. महापौरांनी परिसरात स्वत: फिरून नागरिकांना घरीच थांबण्याचे व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.