जळगाव : हातभट्टी दारू पाडणाऱ्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात उठाबशा काढायला लावणे, त्यांच्याकडून अभद्र काही तरी वदवून घेणे.. त्यानंतर स्वत:चे भाषण इथवर ठीक होते. मात्र, कोरोना संशयिताचा मृतदेह तालुक्यात आणू नये यासाठी शिवीगाळ दमदाटी, लॉकडाऊनचे उल्लंघन करून पोलिस ठाण्या बाहेर जमाव जमवणे.. बढतीचे सत्कार समारंभ आणि आता टिकटॉकवर सिंघम स्टाईल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या यावल पोलिस निरीक्षकाच्या या कृत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच या "गावठी सिंघम'ची एमआयडीसी पोलिस ठाण्यासाठी निवड होणार असल्याने या ठाण्याचे कार्यक्षेत्रही चिंतेत आहे.
डांभुर्णी (ता.यावल) येथील बालकाच्या खून प्रकरणातील संशयित यश पाटलाला अटक केल्यानंतर त्याने तीन खुनाची कबुली दिली. यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर जमावाने संशयिताला आम्हाला सोपवावे यासाठी आग्रह धरला होता. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेकीसह, ग्रामपंचायतीवर हल्ला आणि यश पाटलाला वाचवल्याच्या संशयातून सरपंचाच्या घरावरही हल्ला झाला होता. स्थानिक राजकारणाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दाखल गुन्ह्यात पत्रकाराला अटक करण्यात आली. इथवर आपल्या कणखर स्वभावाचे दर्शन घडवणाऱ्या अरुण धनवडेंची त्यानंतर एकामागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. लॉकडाऊनच्या काळात यावल तालुक्यातील दहा-पंधरा गावठी दारू पाडणाऱ्या पोलिस ठाण्यात उठाबशा काढायला लावून त्यांना विषारी दारूने लोकं का मरतात याचे भाषण देण्यात आले. अशातच जळगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांची मद्य तस्करी प्रकरणात नियंत्रणकक्षात रवानगी झाल्याने रिक्त जागेसाठी अरुण धनवडे यांच्यासह तीन पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवले होते, त्यात अरुण धनवडे यांची सरशी ठरणार असल्याचे संकेत असतानाच साहेबांचे वादग्रस्त विषय रोजच समोर येऊ लागले आहे.
लॉकडाऊनमध्ये मेळावा
राज्यात लॉकडाऊनचे पालन होत असताना (ता.25) शंभर- सव्वाशे ग्रामस्थांचा जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात एकवटतो... साहेबांची बदलीच होऊ नये यासाठी घोषणाबाजी होते... साहेब अरुण धनवडे हे देखील या जनसमुदायाला संबोधित करतात.. येथे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे निर्बंध आणि संचारबंदी-जमाव बंदीचे कायदे पायदळी तुडवले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांचे गल्लो-गल्ली स्वागत सत्काराचे आयोजन होते, येथेही सोशल डिस्टन्सींग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होते.
अन् सिंघम अंगात आलायं
अंधश्रद्धेतून एखाद्या महिलेच्या अंगात देवी येते, भगताच्या अंगात अमुक देवाचा संचार होतो... तसाच काहीसा प्रकार निरीक्षक धनवडेंच्या बाबतीत घडल्याची चर्चा सध्या आहे. "शोले'तील वीरु पाण्याच्या टाकीवर चढून गाव गोळा करतो, अगदी तसेच एका उंच चौथऱ्यावर निरीक्षक अरुण धनवडे चढलेले आहेत.. व्हिडीओवर पार्श्वगीत "सिंघम.. सिंघम' सुरू आहे.. आणि खाली उभ्या लोकांसमोर साहेब स्टाईल दाखवत असल्याचा "टिकटॉक' या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.