"जातीबाहेर' असल्याचे सांगत मुलास लग्नमंडपातून हकलले 

mansi bagde
mansi bagde
Updated on

जळगाव : पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना जळगावच्या कंजरवाड्यात गेल्या महिन्यात घडली. जातपंचायतीच्या अमानवीय छळाला कंटाळून उपवर तरुणीने आत्महत्या केली. घटनेच्या सुरवातीपासूनच पोलिसांची "बोटचेपी' भूमिका राहिलेल्या या प्रकरणाने महाराष्ट्राचे मंत्रालय हादरले असताना स्थानिक पोलिस मात्र निर्धास्त आहेत. पीडित परिवाराला पोलिस संरक्षण मिळाले नाही. साताऱ्याची सहंसमल कंजर संसद जळगावात येऊन गुप्त बैठक घेऊन जाते तरी पोलिस काहीच करत नाही.  


मानसी ऊर्फ मुस्कान बागडे (वय 19) हिच्या आईचा धर्म वेगळा असल्याने आजोबाने वडिलांचे दुसरे लग्न लावून दिले. आईने तेव्हा प्रेमाखातर सहन केले. मात्र ती घोडचूक मुली मोठ्या झाल्यावर नडत आहे. कोल्हापूर येथे प्राध्यापक मुलाशी लग्न ठरले असताना दिनकर बागडे (आजोबा) याने या परिवाराला जातीत घेऊ नये, यासाठी दबाव आणला. दोन दिवसांवर साखरपुडा असताना त्रासलेल्या मानसीने अखेर मृत्यूला कवटाळले. मृतदेहावर 15 हजार जबरी वसूल करून जातपंचायतीने "जातगंगा'विधी केला व मृतदेह जातीत घेत अंत्यस्काराला परवानगी दिली. मात्र, तत्पूर्वीच प्रकरणाचा बोभाटा होऊन शवविच्छेदनानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तद्‌नंतर जातपंचायत याच्यात दोषी आढळून आल्यावर आठ संशयितांना आरोपी करण्यात आले. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार अधिनियम-2016 अन्वये गुन्हा दाखल झाल्यावर संशयित पंचांनी शहरातून पलायन केले. पळून गेलेल्या पंचांची माहिती अंनिस कार्यकर्ते पोलिसांना वेळोवेही पुरवत असून, तरी पोलिसांनी अद्याप एकाही पंचाला अटक करण्याची हिंमत दाखवली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी गुरुवारी (ता. 6) पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उलगडा केला. पोलिस प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढत पीडितेच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण व फरार जातपंचायतीवर तत्काळ अटकेच्या कारवाईची मागणी केली होती. त्यावरही अद्याप दखल घेतली गेली नाही. 

आणखी एक कुटुंब "जातीबाहेर' 
मृत मानसीच्या लग्नासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून तिच्या कुटुंबाच्या पाठीशी विजय बागडे हा तिचा काका उभा होता. विजय यांचा पाणीजार पुरविण्याचा व्यवसाय आहे. जाखनीनगरात आज एक लग्नसोहळा होता. तेथे त्यांच्याकडूनच पाणी जार पुरविण्यात आले. खाली जार घेण्यासाठी त्यांचा मुलगा कुणाल लग्नमंडपात गेला असता, येथे कालू ऊर्फ सन्नाटा माचरे याने.. तू कसा काय आमच्या लग्नात आला..तुम्हाला जातीबाहेर काढले आहे..असे म्हणत अरेरावी करून कुणाल याला हकलून लावले. त्याने घडला प्रकार वडिलांना सांगितल्यावर विजय बागडे यांनी जाब विचारला. म्हणून सायंकाळी कालू ऊर्फ सन्नाटा माचरे व त्याच्या साथीदारांनी विजय बागडे यांच्या घरावर हल्ला चढवला. विजय बागडे यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येऊन सन्नाटाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. 

घटनेला प्रशासनच जबाबदार : अंनिस 
जातपंचायतीची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिस यंत्रणा अपूर्ण पडत आहे. अंनिसने यापूर्वी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन बागडे परिवाराला पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. आज घडलेल्या घटनेसाठी जिल्हाधिकारी व पोलिस दल जबाबदार आहे. तत्काळ बागडे परिवाराला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा कायदा व्यवस्थापन विभागाचे ऍड. भरत गुजर, वासंती दिघे आदींनी केली आहे. 

सहंसमल कंजरभाट संसद 
कंजरभाट समाजाच्या जातपंचायत यंत्रणेची सर्व सूत्रे पुणे आणि सातारा येथून हलविली जातात. जळगावात गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदार बानोबी याची भेट घेण्यासाठी सहंसमल संसदेचे पदाधिकारी राजेश नवले, सोहन नवले (दोन्ही रा. सातारा), मुकेश मिणेकर (रा. पुणे) शुक्रवारी (ता.7) जळगावात आले होते. सावन गागडे याच्या घरी त्यांची गुप्त बैठक झाली. घडल्या प्रकाराची पूर्वकल्पना अंनिसने दिली असतानाही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. समाजबांधवांना जो संदेश त्यांना द्यायचा होता, ते देऊ निघून गले. नंतर पोलिसांनी फोन लावल्यावर फॉच्युनर कारने (एमएच 11, एक्‍स बी.300) ते जळगावाबाहेर निघून गेल्याची माहिती समोर आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.