मतदारसंघ सर्वार्थाने सक्षम, संपन्न, वैभवशाली करणारच : दिलीप वाघ 

मतदारसंघ सर्वार्थाने सक्षम, संपन्न, वैभवशाली करणारच : दिलीप वाघ 
Updated on

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगारांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने या मतदारसंघाचे पूर्वीचे वैभव डागाळले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाला अनुभवी, कणखर व विकासशील नेतृत्वाची गरज आहे. या समस्यांवर मात करून मतदारसंघ सर्वार्थाने संपन्न, सक्षम व वैभवशाली बनविण्यासाठीचे आपले ‘व्हीजन’ आहे. यावेळी नेतृत्वाची संधी मिळाल्यास नियोजनबद्धरीत्या कामे करून मतदारसंघाचा कायापालट करू’, असे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना स्पष्ट केले. 

दिलीप वाघ यांनी सांगितले, की विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्वगुण विकसित झाले. नगराध्यक्षपदापासून राजकीय कारकीर्द सुरू झाली असली तरी माझे पिताश्री शिक्षण, सहकार महर्षी व समाजवादी नेते (कै.) ओंकार (आप्पा) वाघ यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा व नेतृत्वाचा जवळून अभ्यास केला आहे. समाजकारणाचे बाळकडू कुटुंबातच प्यायला मिळाल्याने राजकीय प्रवाहात आलो. पाच वेळा नगराध्यक्षपद भूषवले. कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ, देखरेख संघ, ‘पीटीसी’ शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थात नेतृत्व केले व करीत आहे. विविध पदांवर कार्य करताना काळ्या मातीशी व समाजाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. अनेकदा पराभवही पत्करावा लागला. त्यामुळे कधी घरात बसून राहिलो नाही. ‘यशाने माजू नका आणि अपयशाने खचू नका’ या (कै.) ओंकार अप्पांच्या व शरद पवारांच्या शिकवणुकीनुसार समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय आहे. 

युतीच्या काळात पिछेहाट 
२०१४ च्या निवडणुकीत मतदार युतीच्या १५ लाख व ‘अच्छे दिन’च्या भूलथापांना बळी पडले. त्यावेळी माझाही निसटता पराभव झाला. युती शासनाच्या पाच वर्षांच्या काळात जनतेला काय मिळाले? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, विद्यार्थी अशा सर्वांचीच या शासनाने निराशा केली. उलट आघाडी सरकारने समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय व स्वाभिमान देऊन त्यांना अभिमानाने उभे करण्याचे काम केले. सरसकट कर्जमाफी झाली. बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या. शेती व शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला. महिलांना आरक्षणासह विविध सुविधा व संधी देऊन महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य झाला. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य या संदर्भातील कामे पूर्णत्वास आली. पाचोरा- भडगाव मतदारसंघातही माझ्या काळातील मंजूर कामे आतापर्यंत पूर्ण केली जात असून, त्याचे श्रेय आमदार घेतात, याचे हसू येते व वाईटही वाटते असे त्यांनी सांगितले. 

विकासाचे व्हिजन 
पाचोरा- भडगाव मतदारसंघात नद्या व धरणे असूनही सिंचनाचे व पाणी टंचाईचे प्रश्न कायम आहेत. यांची सोडवणूक करण्यासाठी नारपार योजनेसह वाघूरचे पाणी मतदारसंघात आणून प्रकल्पांची उर्वरित कामे पूर्ण करू. सहकारी संस्थांना आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढून सहकारातून समृद्धीचा उद्देश साध्य करण्याचे नियोजन आहे .रोजगार संधी उपलब्ध करणे, ग्रामीण भागातील शाळा सक्षम करणे, सरसकट कर्जमाफी, गट शेतीला प्रोत्साहन, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करून पर्यटन क्षेत्राला चालना मिळवून देणे, कापूस, केळी, ऊस, मका उत्पादनावर आधारित विविध उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणे आदी कामे केंद्रस्थानी आहेत. 

समस्या सोडविण्यावर भर 
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा उद्देश साध्य करणे, बेरोजगारांना व्यवसायासाठी कमी खर्चाची व्यापारी संकुले उपलब्ध करून कर्ज उपलब्ध करून देणे, बेरोजगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता, महिला बचत गटांच्या उत्पादित मालासाठी बाजारपेठा, सरसकट कर्जमाफी, कृषी पंपांना पुरेशा दाबाने व पूर्णवेळ वीज पुरवठा, रस्ते, वीज, पाणी, पथदिवे, साफसफाई, स्वच्छता, प्रमुख रस्ते व चौक यांचा विकास, ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते व शेत रस्ते, माता-भगिनी व वृद्धांसाठी योग्य त्या सुख सुविधा, शांततामय व सुखी जीवन अशा कामांसंदर्भातील विकासाचे ‘व्हीजन’ समोर ठेवून त्यासंदर्भातील नियोजन केले असल्याचे सांगून या ‘व्हिजन’च्या आधारे मतदार यावेळी नेतृत्वाची संधी देतील, असा विश्वास दिलीप वाघ यांनी व्यक्त केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()