केळी धाग्यापासून हस्तकला वस्तूंचे उत्पादन 

केळी धाग्यापासून हस्तकला वस्तूंचे उत्पादन 
Updated on

सावदा  : केळी धाग्यापासून विविध हस्तकला वस्तू तयार करण्यास महिलांना यश आले असून, येथील ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग प्रोडक्ट या संस्थेत प्रशिक्षणास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रावेर तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी केळी धाग्यापासून विविध वस्तू तयार केल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे ‘बनाना सिटी’ म्हणून ओळख असलेल्या सावदा, फैजपूर भागात नव्याने रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. 

ताप्ती व्हॅली बनाना कृषी विभाग आत्मा अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून या मोफत प्रशिक्षणाला सुरवात झाली. कोईमतूर (तामिळनाडू) येथील इको ग्रीन युनिट या संस्थेचे प्रमुख डॉ. पूजा सिंह व डॉ. निरज सिंह हे महिलांना प्रशिक्षण देत आहेत. या कलेबाबत माहिती देताना पूजा सिंह म्हणाल्या, शेतकरी केळी खोडाला निरर्थक समजून फेकून देतो; पण याच खोडापासून तयार होणाऱ्या आकर्षक हस्तकला वस्तूंना मोठी मागणी आहे. भारतात २० ते २५ वर्षांपूर्वी तामिळनाडूतील कोईमतूर येथे प्रथमच या कलेचा उगम होऊन, त्यावर संशोधन झाले. जळगाव जिल्ह्यात तर केळी मोठ्या प्रमाणात होते, त्याचा उपयोग हस्तकलेसाठी केला जाऊ शकतो. याचा विचार करून ताप्ती बनानाचे संस्थापक चेअरमन हरिभाऊ जावळे व प्रभारी चेअरमन डॉ. आर. एम. चौधरी आणि संचालक मंडळाने महिलांसाठी केळी धाग्यापासून विविध वस्तू तयार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा महिलांनी घेतला पाहिजे. तर या नवीन उद्योगामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळून, परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असे डॉ. आर. एम. चौधरी म्हणाले. 

अशी आहे प्रक्रिया 
केळी धाग्याला कंगव्याने साफ केले जाते. त्यानंतर पाहिजे त्या रंगात धागा रांगविला जातो. आणि महिला डोक्यावरील केसांची जसी वेणी घालतात, त्याचप्रमाणे केळी धाग्याची विनाई करून झाल्यावर सुई धाग्याने हात शिलाई करून विविध वस्तू तयार केल्या जातात. गेल्या सात दिवसात केळी धाग्यापासून तोरण, पायपुसणी, पर्स, मोबाईल पॉकेट, मॅट, बॅग, डॉल आदी विविध आकर्षक वस्तू तयार केल्या. विशेष म्हणजे या सर्व वस्तू घर बसल्या तयार केल्या जाऊ शकतात. 

सहज, सोपे प्रशिक्षण 
प्रशिक्षक पूजा सिंह व निरज सिंह यांनी सोप्या पद्धतीने वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले असे सखी महिला बचत गट यावल अध्यक्ष सुनीता भोईटे, सावित्री यावलकर, रोहिणी झोपे, शारदा भोसले, नीता डाळवाले, शीतल म्हालकर, सुगंधा महाजन, सर्वज्ञ महिला बचत गटाच्या वैशाली पाटील भुसावळ, रेखा सरोदे सावदा, मनुमता महिला बचत गट मस्कावद यांनी सांगितले. 

महिलांना रोजगार : जावळे 
आपल्या जिल्ह्यात केळी खोड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ताप्ती बना संस्था केळी खोडापासून शेतीसाठी बायो फर्टीलायझर्स तर तयार करीत आहेत. तर आता धाग्यापासून विविध हस्तकला वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरू करीत आहोत. त्यामुळे महिलांना प्रगतीसाठी मोठी संधी आहे. असे ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग प्रोडक्स संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी खासदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.