शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत शहर व तालुक्यात दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. सर्वत्र दवाखाने फुल असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. झालीच तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, रुग्णवाहिका आदी बाबींच्या तुटवडा जाणवत आहे. हे सारे दृश्य पाहून पोटापाण्यासाठी अनेक वर्षांपासून आपले गाव सोडून शहरात स्थायिक झालेले केरळ राज्यातील अनेक कुटुंब भयभीत होऊन ‘गड्या आपले गाव बरे’, असे म्हणत शहर सोडून परतत आहेत.
शहर व तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूही वाढत आहेत. शहरात अनेक कुटुंब केरळस्थित असून, छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. ते अनेक वर्षांपासून शहरातच कुटुंबासमवेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यातीलच एका व्यक्तीला कोरोना संक्रमणानंतर झालेली वाताहत पाहून अनेकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण झाली. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक वर्षांपासून शहरात स्थायिक झालेल्या केरळ राज्यातील एका कुटुंबातील सदस्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले, की आम्ही अनेक कुटुंबांनी आपल्या मूळ गावी जायचे ठरवले. काही कुटुंब तर मार्गस्थही झाले. आमच्या राज्यात मृत्यूचा दर एवढा नाही. शिवाय आमच्याकडे निदान वेळेवर तरी सुविधा उपलब्ध होतील, यामुळे कुटुंबांनी आपल्या मूळ गावी जाणे पसंत केले आहे.
मुंबईहून मागविले रेमडेसिव्हिर
शहरातील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सुचविल्यानंतर संबंधित इंजेक्शनसाठी सर्वत्र भटकंती केली, पूर्ण जिल्हा चाचपला. अखेर एका नातेवाइकाला सांगून थेट मुंबईहून इंजेक्शन मागवून गरज भागवली. असे एक ना अनेक अनुभव रुग्णाच्या नातेवाइकांना येत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घेऊन रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.