शहादा (जि. नंदुरबार) : गेल्या काही वर्षांपासून आधुनिकतेच्या नावाखाली विवाहानिमित्त अनेक कुटुंबांकडून प्री-वेडिंग शूट, मेंदी, हळद, नाचगाणी (Dance) असे खर्चिक व समाजाच्या
आदर्श संस्कृतीत न बसणारे कार्यक्रम होत आहेत. (marriage will happen without Pre Wedding shoot Henna Turmeric dance to Avoiding costly undesirable practices nandurbar news)
या साऱ्या कार्यक्रमांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यातील व लगतच्या गुजरातमधील सीमावर्ती भागातील गुजर समाजबांधव एकत्रित येत गावागावांत बैठका घेऊन सर्वानुमते एकत्रित येत खर्चिक व समाजाला आदर्श नसणाऱ्या प्रथांना आळा घालण्यासाठी बैठकीत एकमताने ठराव करत असून, समाजस्तरावर या निर्णयाचे कौतुक होत आहे.
परदेशासह पंचतारांकित शहरातील मंगलप्रसंगी होणारे कार्यक्रम काही वर्षांपासून ग्रामीण भागात पोचले आहेत. शहरी भागातील अनावश्यक प्रथांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात समाजमान्यता मिळत असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे. गुजर समाजबांधवांची विवाह समारंभ वेळेत लावण्याची प्रथा कायम आहे.
समाजातील अनेक चालीरीती व खर्चिक बाबींना आजपर्यंत लगाम लावून साध्या पद्धतीने विवाह लावण्यावर मोठ्या प्रमाणावर भर असतो. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीने अनेक लोकांना संकटाच्या खाईत ढकलले.
यामुळे सर्वत्र आर्थिक चणचण जाणवू लागली होती. त्यातच कालपरत्वे विविध गोष्टी नवनवीन येत आहेत. त्यांचा स्वीकार करत काही ठिकाणी प्री-वेडिंग, मेंदी आदी कार्यक्रम केले जात होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
या कार्यक्रमांनी काही प्रमाणात आर्थिक भार सोसावा लागत होता. मंगलमय वातावरणात होणाऱ्या कार्यक्रमात आनंदोत्सव साजरा करताना आपली सभ्यता व संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी समाजबांधवांची आहे. यासाठी काही गावांतील महिला भगिनी व पुरुष बांधवांनी पुढाकार घेत या प्रथांना बंद करण्यास सुरवात केली.
पाहता पाहता गावागावांत या खर्चिक प्रथांना आळा घालण्यासाठी महिला व पुरुष वर्गाने पुढाकार घेत बैठका घेणे सुरू केले. गावागावांत एकमताने ठराव होत खर्चिक बाबींना विरोध करण्यात येत असून, समाजस्तरावर या चांगल्या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.
गुजर समाजाचा आदर्श
काही वर्षांपासून आधुनिकतेच्या नावाखाली थेट मोठ्या शहरात होणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या रेलचेलचे लोन ग्रामीण भागातही पोचले असल्याने शुभमंगलप्रसंगी उपस्थितांसमोर होणारे हे आदर्शहीन अनुचित प्रदर्शन थांबणे आता गरजेचे झाले आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मेंदी, हळद, नाचगाणी अशा अनिष्ट प्रथा बंद करून समाजहित जपण्यासाठी समाजबांधव पुढे येत आहेत. या निर्णयाचे गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील, मोतीलाल पाटील तसेच समाजातील अन्य नेत्यांनी स्वागतच केले आहे. जिल्ह्यातील गुर्जरबहुल गावांनी घेतलेल्या या हितावह निर्णयाचे अनुकरण इतरही समाजबांधवांनी करणे काळाची गरज ठरणारे आहे.
"आर्थिक परिस्थिती सक्षम असलेली कुटुंबे अनावश्यक बाबींवर खर्च करू शकतात. मात्र समाजातील सर्वच घटकांचा विचार करता कुप्रथा व निरर्थक बाबींना मंगलप्रसंगी दूर ठेवणे काळाची गरज आहे. सामाजिक सुधारणांचा प्रारंभ स्वतःपासून करणे खरा आदर्श निर्माण करणारी बाब असते. आपल्या चिरंजीवांच्या मंगलप्रसंगी खर्चिक व अनिष्ट प्रथांना आपण दूर ठेवणार आहोत." -प्रा. मकरंद पाटील, समन्वयक, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ
"गावोगावी समाजबांधवांच्या होत असलेल्या बैठकांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्याचा विचार समाजबांधव करत आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. प्रत्यक्षात या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी गावागावांत ठराव होत आहेत. ठरावासोबत अंमलबजावणीही होत आहे, ही समाजासाठी अभिनंदनीय बाब आहे. निश्चितच यातून निरर्थक खर्चाला आळा बसेल." -अभिजित पाटील, माजी सभापती, जिल्हा परिषद, नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.