धुळे : राज्यात काही शहरांमध्ये झालेल्या गोवरच्या उद्रेकाचा धोका धुळे शहरापर्यंतही पोहोचला. मंगळवारी (ता.२८) प्राप्त अहवालानुसार धुळे शहरात प्रामुख्याने मुस्लिमबहुल भागात गोवरचे नव्याने ३४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आजअखेर सुमारे साडेतीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत. सद्यःस्थितीत धुळे शहरात साधारण पाच भागात गोवरचा उद्रेक आहे.
मुंबईसह ठाणे, पनवेल व इतर काही शहरांमध्ये गोवरचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य शासनाने उपाययोजनेच्या अनुषंगाने यंत्रणांना निर्देश दिले. यात बालकांच्या लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. (Measles Increase in Muslim majority areas in Dhule Dhule News)
धुळे शहरातही गोवरचा शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली खरी पण अद्यापही धुळ्यात गोवरवर नियंत्रण मिळवता आले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल ते २४ नोव्हेंबरदरम्यान धुळे शहरात एकूण ५९ संशयित रुग्ण होते.
यात फक्त नोव्हेंबरमधील पहिल्या २२ दिवसात ३१ संशयितांचा समावेश होता. त्यात सात पॉझिटिव्ह समोर आले होते. दरम्यानच्या काळात महापालिकेकडून लसीकरण मोहीम, सर्वेक्षण सुरू करण्यात आले. गोवर सर्वेक्षणाचे काम पूर्णही झाले. मात्र, त्यानंतरही गोवरचा उद्रेक संपलेला नाही असे चित्र आहे.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
एकूण ६७ पॉझिटिव्ह
धुळे शहरात आतापर्यंत एकूण ३४१ गोवर संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, यातील ६७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अर्थात शहरात आत्तापर्यंत गोवर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६७ झाला आहे. यात नोव्हेंबरमधील ३३ तर डिसेंबरमध्ये ३४ पॉझिटिव्हचा समावेश आहे. त्यामुळे गोवरचा धोका शहरात वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या माध्यमातून लसीकरणावर भर देण्यात येत असला तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने समस्या असल्याचे कारण सांगितले जाते. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पुन्हा लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बुस्टर डोसही देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मनपाच्या डॉक्टरांनी सांगितले.
या भागात उद्रेक
गोवर संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रामुख्याने शहरातील मुस्लिमबहुल लोकवस्तीत जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यःस्थितीत शहरातील तिरंगा चौक-बाबानगर, आझादनगर-भोईवाडा, मुस्लिम नगर-मिल्लत नगर, जामचा मळा-देडावालाबाब नगर मोहाडी व तिखी रोड या साधारण पाच भागात गोवरचा उद्रेक असल्याचे महापालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.
अधिक प्रयत्नांची गरज
गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी लसीकरण हा प्रमुख उपाय मानला जातो. त्यामुळे बालकांना गोवर प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक आहे. संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांचे यापूर्वी लसीकरण झाले नसल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे लसीकरणावर भर हाच यावर उपाय आहे. मुस्लिमबहुल भागात लसीकरणालाच प्रतिसाद नसल्याचे कारणही पुढे आले होते. त्यामुळे अशा भागात बालकांच्या लसीकरणासाठी प्रबोधन, जनजागृतीची अधिक गरज आहे. त्यादृष्टीने महापालिकेला अजून प्रयत्न करावे लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.