Dhule Crime News : येथील शुभम साळुंखे खून प्रकरणी भाजपचा माजी शहर-जिल्हा उपाध्यक्ष विनोद थोरात याच्यासह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) अर्थात ‘मोक्का’ची कठोर कारवाई झाली आहे.
त्यामुळे गुन्हेगारी जगताचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी आरोपी थोरात याच्यासह तीन फरारी आरोपींचाही लवकरच शोध घेतला जाईल, अशी माहिती नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Mokka for 10 accused in Dhule In case of murder dhule crime news)
शुभम साळुंके खून प्रकरणी श्री. धिवरे यांनी शुक्रवारी (ता. २४) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले, की ८ ऑक्टोबरला शुभम साळुंके या तरुणावर आरोपी महेश पवार ऊर्फ लाल डोळा (रा. स्वामिनारायण कॉलनी), अक्षय साळवे (रा. गायकवाड चौक), गणेश माळी (रा. स्वामिनारायण कॉलनी), भूषण वाडेकर (रा. शांतीनगर), जगदीश चौधरी (रा. स्वामिनारायण कॉलनी), शरद (पूर्ण नाव निष्पन्न नाही, रा. नाशिक), गणेश पाटील, जिभ्या (रा. गायकवाड चौक, पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन ते तीन जणांनी धारदार कोयते, लोखंडी रॉड, फायटरने शुभम व त्याच्या मित्रास मारहाण केली. १४-१
मोक्काच्या शिक्षेस पात्र
शुभमला बळजबरीने दुचाकीवर बसवीत वरखेडी रोडवरील मनपा डम्पिंग मैदानावर नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. यात आरोपी विनोद रमेश थोरात (रा. मनमाड जीन, धुळे) व त्याचा सहकारी हर्शल रघुनाथ चौधरी याने गुन्ह्यातील आरोपींना पूर्ववैमनस्यातून शुभम यास ठार करण्यासाठी सुपारी व चिथावणी दिल्यामुळे हा गुन्हा घडला.
या प्रकरणी ९ ऑक्टोबरला आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करीत आरोपींनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत संघटित गुन्हेगारी केल्याचे आणि त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेले गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कारवाईची मंजुरी
या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे मोक्काअंतर्गत कारवाईची परवानगी मागितली. त्यानुसार महानिरीक्षकांनी शुभम साळुंके खून प्रकरणी आरोपींना मोक्काची कारवाई करण्यास परवानगी दिली.
त्यानुसार दहा आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. या प्रकरणी शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना तपास सोपविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिली.
गुंडांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई
शुभम साळुंखे खून प्रकरणी आरोपींवरील दाखल गुन्ह्यांचा अभ्यास केला असता त्यांच्याविरुद्ध आणखी इतर २६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काची कारवाई झाली. शहरात आणखी काही गुंडांच्या टोळ्या सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीचा काळ लक्षात घेता गुंडांच्या टोळ्यांवर तांत्रिक अभ्यासानंतर मोक्कामधील तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका पोलिस अधीक्षक धिवरे यांनी मांडली. तसेच भयमुक्त, दहशतमुक्त धुळ्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.