Nandurbar Rain News : नंदुरबार जिल्ह्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी फिरल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील मॉन्सूनचा हंगाम संपला आहे. खरीप पिकांसाठी महत्त्वाचा असणारा मॉन्सून माघारी गेल्याने आता शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाकडे लक्ष लागले आहे.
त्यात यंदा तळोदा तालुक्यात पावसाने जेमतेमच सरासरी गाठल्याने कूपनलिकेचे पाणी किती काळ टिकते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. ( monsoon has return from Maharashtra nandurbar news)
दुसरीकडे सध्या सकाळी गारवादेखील निर्माण होत असल्याने हिवाळ्याची चाहूलदेखील लागली आहे. यंदाचा मॉन्सून नंदुरबार जिल्ह्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी फिरण्याची घोषणा हवामान विभागाने शुक्रवारी केली. यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले तरी समाधानकारक पाऊस बरसला नव्हता.
त्यानंतर जुलैमध्ये पावसाने हजेरी लावून पेरणीयोग्य पाऊस झाला होता. मात्र नदी-नाल्यांना पूर आला नव्हता. दुसरीकडे ऑगस्टमध्ये पावसाने हजेरी लावत तूट भरून काढली होती. त्यानंतर मात्र पावसाने २० दिवसांहून अधिक काळ ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले होते.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला होता. दुसरीकडे तळोदा तालुक्यात सर्वांत कमी पाऊस बोरद मंडळात झाला असून, सर्वाधिक पावसाची हजेरी सोमावल मंडळात झाली आहे. पावसाची सरासरी ७८८ मिलिमीटर असताना पावसाने जेमतेमच सरासरी गाठली आहे. त्यात तालुक्यात सरासरी ७९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सध्या खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग ही पिके काढणीवर आली आहेत. कापूस पिकाचा हंगाम सुरू झाला असून, भाव नसल्याने कापूस साठवण करण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात आता मॉन्सून माघारी फिरल्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांचे आता रब्बी हंगामाकडे लक्ष लागले आहे.
रब्बी हंगामाची तयारी
ऑक्टोबर सुरू झाल्यानंतर रात्री व सकाळी हवेत चांगलाच गारवा निर्माण होत आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली असून, सकाळी गारव्यात फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात सकाळी दवबिंदू पडत असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारीदेखील सुरू केली आहे.
''भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी फिरला आहे. आता पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहणार आहे.'' -सचिन फड, कृषी हवामान शास्त्रज्ञ, कृषी हवामान केंद्र, नंदुरबार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.