Dhule News : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे बहुसंख्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‘मज्जाच मज्जा’ झाली. मात्र, यामुळे काही वरिष्ठांसह इतर अधिकाऱ्यांना डोकेदुखी सहन करावी लागत आहे. दर आठवड्याला शनिवार, रविवारी अनेक अधिकारी मुख्यालय सोडून घरी पळतात.
त्यामुळे विविध कामांच्या अनुषंगाने मुख्यालयी हजर असलेल्या अधिकाऱ्यांनाच कसरत करावी लागते. (Municipal Commissioner order to officers not leave headquarters dhule news)
त्यामुळे मुख्यालय सोडण्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घ्या, असा आदेशच महापालिका आयुक्तांना काढावा लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांशी निगडित कामे असतात. मात्र, धुळे महापालिकेतील बहुतेक वरिष्ठ अधिकारी शासकीय सुटी तसेच शनिवार, रविवारी वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
तरी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विभागप्रमुखांनी शासकीय सुटीत तसेच शनिवार, रविवार या दिवशी मुख्यालय सोडू नये. तसेच महत्त्वाच्या कामासाठी जाणे आवश्यक असल्यास वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, याबाबत दक्षता घ्यावी, असा आदेश महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी काढला आहे.
शासकीय कार्यालयामध्ये कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्यातील तीन-चार दिवसच केवळ अधिकारी-कर्मचारी ऑफिसेसमध्ये पाहायला मिळतात. पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी असायची त्यामुळे महिन्यातील दोन आठवडे अशी स्थिती पाहायला मिळायची.
मात्र राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने महिन्यातील चारही आठवडे अशी स्थिती दिसून येते. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कायमच गर्दी असते त्या कार्यालयांमधील ही स्थिती सामान्य नागरिकांसह काही अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनल्याचे दिसते. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी, नागरिकांची रोजच काही ना काही कामे असतात.
मात्र, त्यांना अधिकारीच उपलब्ध होत नाहीत. याशिवाय शासनाकडून विविध बैठका, व्हीसी, महत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा आदी विविध कामांच्या अनुषंगाने माहिती मागविण्याचे काम सातत्याने सुरू असते. अशा वेळी संबंधित अधिकारीच वेळेवर उपस्थित नसतात. त्यामुळे काही वरिष्ठ व काही स्थानिक अधिकाऱ्यांनाच सगळी कसरत करावी लागते. शिवाय सर्वसामान्यांची कामेही खोळंबतात असे चित्र पाहायला मिळते.
तीनच दिवस ऑफिस?
पाच दिवसांचा आठवडा असला तरी जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांची शुक्रवारीच घरी जाण्यासाठी पळापळ सुरू होते. अनेक जण दुपारीच गायब होतात. त्यानंतर सोमवारी ऑफिस असले तरी ते दुपारपर्यंत पोचतात. त्यामुळे सोमवारीदेखील टंगळमंगळच असते.
त्यामुळे मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीनच दिवस अशा अधिकाऱ्यांचे चेहरे पाहायला मिळतात. शिवाय यादरम्यान, लागून सुट्या आल्या तर चंगळच होते. वरिष्ठ अधिकारी नसतात, त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचेही फावते. त्यामुळे पाच दिवसांच्या आठवड्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.