Dhule Wax Factory Fire : वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्कल कॅण्डलच्या (मेणबत्ती) वासखेडी (ता. साक्री) येथील अवैध कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेत पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. (mystery of death of 5 women in wax factory fire accident remains unsolved dhule news)
यात मायलेकीचा समावेश आहे. शहारे आणणारी ही घटना मंगळवारी (ता. १८) दोनच्या सुमारास घडली. मृत चौघींना बचावात्मक हालचाल करण्यासाठीही वेळ न मिळाल्याने ही गंभीर घटना शॉर्टसर्किटमुळे आग, पत्राच्या शेडमध्ये वीजप्रवाह उतरल्याने की स्फोटामुळे घडली हा तपासाचा भाग असून, अद्याप मृत्यूचे गूढ कायम आहे.
घटनेत एक तरुणी गंभीर जखमी असून, ती नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. आदिवासीबहुल वासखेडी परिसरात पाच वर्षांपासून २५ बाय २५च्या खोलीत स्पार्कल कॅण्डल बनविण्याचा भवानी सेलिब्रेशन नामक कारखाना सुरू होता.
यात दीड वर्षापासून आशाबाई भय्या भागवत (वय ३४) व मुलगी पूनम ऊर्फ राजश्री (१६) या मायलेकींसह नैनाबाई संजय माळी (४८), संगीता प्रमोद चव्हाण (३५), निकिता सुरेश महाजन (१८), सिंधूबाई धुडकू राजपूत (वय ६२, रा. सर्व रा. जैताणे, ता. साक्री) व इतर महिला कामासाठी जात होत्या.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
मृतदेहच आढळले
भवानी सेलिब्रेशन कारखाना रोहिणी जगन्नाथ कुवर (रा. पुणे) आणि सुयेश शापू माने (रा. धोत्री, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांच्या मालकीचा असून, सुपरवायझर म्हणून रोहिणी कुवर हिचे वडील जगन्नाथ रघुनाथ कुवर (रा. वासखेडी) कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कारखान्यात अनुचित घटना घडली.
याविषयी दुपारी पावणेतीनच्या सुमारास वासखेडीतील एकाने आशाबाई भागवत हिचे मजूर पती भय्या सुरेश भागवत (वय ३६, रा. जैताणे) यांना जैताणे येथील संगीता चव्हाण, निकिता महाजन या कारखान्यात भाजून जखमी झाल्याची माहिती दिली. हे समजताच भय्या भागवत यांनी जैताणे आरोग्य केंद्रात धाव घेतली.
जखमींची पाहणी केल्यानंतर भय्या भागवत पत्नी व मुलीची माहिती घेण्यासाठी कारखान्याकडे धावले. त्या वेळी गर्दी दिसली. पाहणीवेळी कारखान्यात त्यांची पत्नी आशाबाई, मुलगी पूनम, नैनाबाई माळी, सिंधूबाई राजपूत या होरपळून मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. शहारे आणणारी स्थिती आणि ही घटना पाहून अनेकांचे मन हेलावले.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या संगीता चव्हाण या ७० टक्के भाजलेल्या महिलेला सायंकाळनंतर धुळे येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. तिचा चिमठाणे (ता. शिंदखेडा) शिवारात वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा पाच झाला आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
स्पार्कल कॅण्डलसाठी स्फोटक दारूचा वापर, कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता कारखाना चालविणे, बालमजूर ठेवणे, मजुरांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना नसल्याने आणि घटनेवेळी ऑपरेटर अरविंद जाधव (रा. वासखेडी) हा पळून गेल्याने पीडित भय्या भागवत यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित रोहिणी कुवर, सुयेश माने, सुपरवायझर जगन्नाथ कुवर, ऑपरेटर अरविंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर पाच जणांच्या मृत्यूस, जखमींना गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
घटनेत निकिता महाजन ही ३० टक्के भाजली आहे. या प्रकरणी गतीने व सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. त्यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही घटनास्थळी भेट देत पीडित नातेवाईकांचे सांत्वन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.