Dhule News : धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव डिसेंबर-जानेवारीतच कोरडाठाक पडला आहे. डेडरगाव तलावही तळ गाठण्याकडे आहे.
धुळेकरांसाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने तलावांची ही तहान धुळेकरांना जाणवत नसली तरी जसजसा उन्हाळा जवळ येईल तशी सगळीकडून पाण्याची मागणी वाढेल. (Nakane Lake Dry due to lack of rains Dhule News)
त्यातून काही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंत्रणेने काळजी घेण्याची गरज आहे. तलावांचा गाळ काढण्यासाठी अद्यापही यंत्रणा गंभीर नसल्याचे चित्र आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात २०२३ मध्ये पावसाने अनेक जिल्ह्यांत पाठ फिरविली. धुळे जिल्ह्यातही तशीच स्थिती राहिली. परिणामी पिके कोमेजली त्यातून शेतकरी संकटात सापडला. पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचा हंगामही जेमतेम होईल असे चित्र आहे.
दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे संकटही आहे. डिसेंबर २०२३, जानेवारी २०२४ मध्येच अनेक ठिकाणांहून पाणीटंचाईच्या हाका येत आहेत. धुळे शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव कोरडाठाक झाला आहे. डेडरगाव तलावानेही तळ गाठला आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या दोन्ही तलावांनी डिसेंबर-जानेवारीतच तळ गाठल्याचे हे चित्र पाणीटंचाईचे सावट अधिक प्रकर्षाने दाखवत असल्याचे दिसते.
अक्कलपाड्याचा आधार
धुळे शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव कोरडा झाला असला, तरी यंत्रणेसह धुळेकर नागरिक तसे बिनधास्त असल्याचे दिसते. अर्थात अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने धुळेकरांना पाणीटंचाईची झळ बसणार नाही, असा विश्वास आहे. त्यामुळेच चिंता नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याची होणारी मागणी येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे विशेषतः यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
गाळ काढण्याची गरज
३२० एमसीएफटी क्षमता असलेला नकाणे तलाव डिसेंबर-जानेवारीतच पूर्णपणे रिकामा झाला आहे. तलाव अक्षरशः भेगाळला आहे. पाण्याची भीषणता दर्शविणारे हे चित्र असले तरी यानिमित्ताने तलावातील गाळ काढून त्याची क्षमता पूर्ववत करण्याची आयती संधी चालून आली आहे. गाळ काढण्याच्या या कामाबाबत मात्र यंत्रणा अद्याप गंभीर नसल्याचे दिसते. नकाणे तलाव पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेचे हात वर आहेत. त्यामुळे यासाठी पाटबंधारे विभागाकडूनच कार्यवाहीची अपेक्षा आहे.
डेडरगावच्या कामाला मुहूर्त
१२० एमसीएफटी पाणीसाठवण क्षमता असलेल्या डेडरगाव तलावात सद्यःस्थितीत ३०-३२ एमसीएफटी पाणी आहे. तलावातून रोज साधारण दोन-अडीच एमएलडी एवढेच पाणी घेतले जाते. त्यामुळे जून २०२४ पर्यंत हे पाणी पुरेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. दरम्यान, डेडरगाव तलावाचा जो भाग आज रिकामा झाला आहे, तेथून गाळ काढण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे.
जे. एम. इन्फ्रा (मुंबई) या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. संबंधित कंपनीने मात्र अद्याप काम सुरू केलेले नाही. तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेची एनओसी घ्यावी, नियमानुसार रॉयल्टी भरावी, असे महापालिकेकडून कंपनीला सांगण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी सांगितले. गाळ काढल्यानंतर डेडरगाव तलावात पूर्वीपेक्षा किमान २० एमसीएफटी पाणीसाठा वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.