Nandurbar Crime News : शहरातील स्टेट बँकेच्या कोरीट नाका शाखेच्या बाहेर असलेले एटीएम मशिन पाच चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, घटनेच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. एटीएम मशिनमधील २६ लाख रुपये लांबविले आहेत. (Nandurbar 26 lakh rupees stolen from ATM machine)
गुरवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोरीट नाका शाखेबाहेर असलेल्या एटीएम मशिनच्या कॅबिनमध्ये पाच जण तोंडावर रुमाल बांधून शिरले. त्या ठिकाणी असलेले एटीएम मशिन सर्वांनी मिळून उचलून बाहेर आणले.
बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात त्यांनी ते मशिन टाकून पलायन केले. सदर एटीएम मशिनमध्ये बुधवारी (ता. २१) सुमारे ३० लाखांची रोकड टाकण्यात आली होती. दिवसभरात सुमारे चार लाखांची रोकड ग्राहकांनी काढल्याने सुमारे २६ लाखांची रोकड मशिनमध्ये शिल्लक होती. ही सर्व रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास एटीएम मशिन चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, एटीएम मशिनची देखभाल, दुरुस्ती, पैशांचा भरणा आदींची जबाबदारी सीएमएस या कंपनीवर असल्याने या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथून नंदुरबारात दाखल झाले.
दरम्यान, एटीएम मशिनच्या कॅबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, पहाटे ३.४० ते चारदरम्यान ही घटना घडली आहे. सदर चोरीस गेलेले एटीएम मशिन हे नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरील कोळदे गावाजवळ फेकलेले आढळून आले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त हे स्वतः सकाळपासून या घटनेच्या मागावर होते; परंतु फिर्याद देणारे कंपनीचे अधिकारी सायंकाळी उशिरा आल्याने पोलिसांत नोंद करण्यास विलंब झाला. तरीही पोलिस अधीक्षकांनी विविध पथके तयार करून तपासासाठी रवाना केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.